इंदापूर :दि.15 : राज्यामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या संदर्भात महायुती सरकार सकारात्मक आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महायुती सरकारपुढे मांडून निश्चितपणे सोडवू, अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे शुक्रवारी (दि.15) दिली.
नागपूर येथे विधिमंडळावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील अंगणवाडीचे कर्मचारी हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त करीत मार्गदर्शन केले.
शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युएटी मिळावी, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वाढवून मिळावे, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात रक्कमेंत वाढ करावी, मोबाईल देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने राज्य विधिमंडळावर मोर्चाचे आयोजन केले होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या रास्त आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्री यांच्याकडे या सर्व मागण्या मार्गी लावणे संदर्भात भेट घेऊन विनंती करू व या सर्व मागण्या सोडविण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू, अशी ग्वाही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
•चौकट :-
====
हर्षवर्धन पाटील यांचे बद्दल कृतज्ञता!
——————————————–
हर्षवर्धन पाटील हे राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री असताना त्यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवून सहकार्य केल्याची आठवण यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सांगितली. हर्षवर्धन पाटील यांच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याचे पुनमताई निंबाळकर यांनी सांगितले.
___________________________