इंदापूर दि.27 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत शुक्रवारी (दि.29) उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे गेली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून भाजप नेते व कार्यकर्त्यांना खालच्या पातळीवरील भाषेमध्ये बोलून मानहानीचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात इतर मुद्द्यांवरती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर चालू महिन्यात दि.20 व दि.25 मार्च रोजी याप्रमाणे 2 वेळा बैठक झाली आहे. या बैठकांना अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील हेही उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये काटे की टक्कर लक्षात घेता, महायुतीचे नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. या मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या सन 2004, 2009, 2014, 2019 या 4 ही निवडणुकांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करीत विजयासाठी निर्णायक अशी किंगमेकर ची भूमिका बजावली आहे.
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राज्याच्या राजकारणामध्ये संयमी नेते म्हणून ओळखले जात आहेत. इंदापूर विधानसभेच्या मागील 4 निवडणुकांमध्ये दिलेला शब्द पाळला गेला नाही, याची नाराजी इंदापूर तालुक्यातील गावोगावच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येत आहे. इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडे असावी, अशी तीव्र मागणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. देशातील हाय व्होल्टेज लढत बारामतीत लोकसभा मतदारसंघांमध्ये होत असल्याने देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या सदर बैठकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.