मुंबई ता. 25 : जलसंपदा पाटबंधारे कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या “राज्य अध्यक्ष” पदी राजेश झणझणे यांची निवड करण्यात आली आहे.
जलसंपदा (पाटबंधारे) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची नुकतीच पुणे येथे बैठक संपन्न झाली.सदर बैठकीसाठी राज्यातील ३२ जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते.सदर बैठकीमध्ये संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदावर श्री.राजेश झणझणे यांची एकमताने निवड झाली आहे.सदरची निवड ही पाच वर्षांसाठी करण्यात आलेली आहे.
अध्यक्ष पदावर निवडीनंतर जलसंपदा विभागातील गट-क व गट- ड संवर्गीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी प्रयत्न करणे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे,जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाबरोबर पुनश्च चर्चा करणे, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर तात्काळ नियुक्ती मिळणेसाठी शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी करणे,व लढा उभारणे, महिला कर्मचा-यांच्या अडी-अडचणी सोडविणे,सातवा वेतन आयोगातील खंड-२ मधील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे,
आठवा वेतन आयोग गठित होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतनस्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी समितीबरोबर चर्चा करणे.कर्मचा-यांच्या पदोन्नतीमधील विलंब टाळण्यासाठी अधिका-यांबरोबर बैठका घेणे.अशा महत्त्वाच्या मागण्यांबरोबरच शासनाकडे प्रलंबित असणा-या महागाई भत्ता,आगाऊ वेतनवाढी,व इतर मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्य अध्यक्ष श्री.राजेश झणझणे यांनी सांगितले.