भिगवण दि. 08 :- भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विविध वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मुख्याध्यापिका सुचिता साळुंके यांनी दिली.
राष्ट्रीय दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन वैज्ञानिक संशोधन, अवकाश संशोधन या विषयांवर वैज्ञानिक प्रकल्पांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , माझी शाळा – माझी प्रयोगशाळा , समृद्ध प्रयोगशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे व सर्व संचालक यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे व विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सुचिता साळुंके ,विज्ञान शिक्षिका सुनिता पोटफोडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.







