इंदापूर दि.28 : बावडा येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मेरी माटी, मेरा देश या अभियाना अंतर्गत परिसरातील गावागावातील कार्यकर्त्यांनी आणलेल्या मातीचे एकूण 5 अमृत कलशा मध्ये बुधवारी (दि.27) संकलन करण्यात आले. या अभियानास बावडा व परिसरातील गावांमधील कार्यकर्त्यांचा व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळत आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये संकलन केलेली माती देशाची राजधानी दिल्लीला नेण्यात येणार आहे. या सर्व कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पती बियाणे यांचे मिश्रण करून दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे. सदरची ‘अमृत वाटिका’ ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक असणार आहे. बावडा येथे माती संकलन प्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, माजी सरपंच किरण पाटील यांचे सह गावोगावचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.