पुणे ता. 19 : महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती स्त्री जाणिवा, आणि स्त्री मुक्तीच्या कवितांचा जागर ‘कविता दुर्गेच्या'(स्वरचित कवितांचे कवयित्रींचे कवीसमेंलन) महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेचे माधवराव पटवर्धन सभागृह., टिळक रोड, पुणे येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. गीताली वि. म. (संपादिका – मिळून साऱ्याजणी आणि स्त्री वादीकार्यकर्त्या) यांनी भुषविले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, प्रभारीप्रमुख कार्यवाह मा. सुनिताराजे पवार, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मा. ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष मा. धंनजय तडवळकर उपस्थित होते.
मा. ज्योत्स्ना चांदगुडे ह्यांनी प्रास्ताविक सादर केले त्या मधे त्यांनी सध्याच्या शिकलेल्या, मिळवत्या मुलींच्या लग्नच नको किंवा लिव्ह ईन रिलेशनशीप, मुलं नको अशा विचारापर्यंत पोहोचलेल्या ह्या नवीन पिढीचं पुढे काय होणार ह्या सगळ्यांपुढे असणाऱ्या प्रश्नाचाही जागर होणं आवश्यक आहे असे विचार मांडले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रभारी प्रमुख कार्यवाह मा. सुनिताराजे पवार ह्यांनी आपल्या प्रास्ताविकात मणीपुरच्या आताच्या काळामधे आपण सगळे शिक्षित असताना, प्रसारमाध्यमे, आपल्यातील एकमेकांच्या संपर्काची माध्यमे इतकी प्रभावी असताना आपण त्या महिलांची काहीही मदत करू शकलो नाही आणि तिथे असलेल्या लोकांच्या मानसिकते विषयी निषेध व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. गीताली वि. म. ह्यांनी “कविता ही जी आपल्या भावनेचा अविष्कार आहे हा भावनेचा अविष्कार सर्व पातळीवरचे सर्व लोक करतात म्हणून मला अस वाटत की कविता साहित्यिक जे प्रकार आहेत त्याच्यातील सर्वात लोकशाहीकरण झालेली आहे. त्याच्यामुळे कविता मला जवळची वाटते. पुढे त्या म्हणाल्या ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष, असा संघर्ष नाही. हा लढा पुरुषसत्ताक व्यवस्थे विरुद्ध आहे. स्त्रीवाद ही राजकीय जाणीव आहे. स्त्री चळवळीचे मुख्य योगदान स्वातंत्र्याची किंमत आहे. स्त्री पुरूष दोघांच्या स्वातंत्र्याची एकच असली पाहिजे त्यातून त्यांची जडणघडण व्हायला हवी. आज स्रियांचे साहित्य अनेक विषयांना स्पर्श करत असले तरी त्यात लैंगिक जाणिवा आणि राजकारणाचे भान यांचा अभाव आहे” असे विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी म्हणाले “साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद आजवर अनेक महिलांनी भूषवले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकाही महिलेने आजवर भुषविलेले नाही. याचे चिंतन पुरोगामित्वाचा आव आणणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी करायला हवे. आजची मराठी कविता जगण्याचा कोलाहल आणि अस्वस्थ वर्तमान अतिशय प्रभावीपणे टिपते आहे. तिच्या आशयात, रूपात आणि भाषेत क्रांतीकारी बदल झाले आहेत.”
ह्या कविसंमेलनात अंजली कुलकर्णी , मीरा शिंदे, सुनीति लिमये, मीना शिंदे, योगिनी जोशी, प्रतिभा पवार, संध्या वाघ, ज्योत्स्ना चांदगुडे, मृणालिनी कानिटकर, वैशाली मोहिते, प्राजक्ता पटवर्धन, प्राजक्ता वेदपाठक, आरती देवगावकर, संध्या गोळे, प्रभा सोनवणे, चंचल काळे, वर्षा कुलकर्णी, निरुपमा महाजन, कविता क्षीरसागर, जयश्री श्रोत्रीय, शैलजा मोळक सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री चिन्मयी चिटणीस यांनी केले.