इंदापूर ता. 27 : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक होऊन जवळपास दहा वर्षाचा कालावधी झाला आहे. त्यामुळे. राज्यात नव्हे तर देशात नशीबवान ठरलेल्या विद्यमान संचालक मंडळाला पाच वर्ष कार्यकाला वर पाच वर्षाचा वाढीव कार्यकालाचा बोनस मिळाला आहे. मात्र दुसरीकडे कारखान्याची निवडणूक रखडल्याने सभासदांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले असून कारखान्याच्या निवडणुकीला कधीचा मुहूर्त मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना पावसाळ्याचा कालावधी तसेच सभासदांच्या यादीवरील आक्षेप क्रियाशील अक्रियाशील सभासदात्वाचा मुद्दा या प्रमुख कारणांमुळे सुरू असलेली न्यायालयीन लढाई तीन वेळा पार पडलेली मतदार यादीची प्रक्रिया तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा कालावधी या व विविध कारणामुळे आजवर विद्यमान संचालक मंडळाला जवळपास पाच वर्षाच्या कार्यकालावर पाच वर्षाचा वाढीव कार्यकालाचा बोनस मिळाला आहे.
अशातच येत्या तीन महिन्यात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत यासाठी संपूर्ण कर्मचारी या कामकाजामध्ये गुंतले जाणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाच्या अभावी इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा आजवरचा इतिहास आहे.
त्यानंतर लगेचच जून पासून पावसाळ्याचा कालावधी सुरू होणार असल्याने जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात सहकारी संस्थांना संस्थांच्या निवडणुकांना सहकार खात्याच्या वतीने स्थगिती दिली जाते.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांचा निकाल लागून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर किंवा पार पडणे गरजेचे आहे.
तसे न झाल्यास राज्यात मुदत वाढीचा कार्यकालाचा बोनस मिळालेल्या नशीबवान संचालकांना पावसाळ्याचा कालावधी संपेपर्यंत आणखी वाढीव कार्यकालाचा बोनस या विद्यमान संचालकांना मिळणार आहे. त्यामुळे कारखान्याची रखडलेली निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू व्हावी. अशी सभासदांची अपेक्षा आहे.
दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळाने आमचा कार्यकाल संपलेला आहे आमच्या कारखान्याची निवडणूक घ्या व तत्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू करा अशी विनंती मागील पाच वर्षांपूर्वीच निवडणूक प्राधिकरणाकडे केलेली आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे अद्याप निवडणूक रखडली आहे त्यामुळे या न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल कधी लागणार व निवडणूक केव्हा होणार ? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे