भवानीनगर ता. 4 : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक एकत्र आले आहेत. एकत्र येत असताना त्यांनी एकमेकाला पेढे लाडू भरवल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. त्यामुळे जाचक यांनी भरणे यांना भरविलेल्या पेढे लाडूतील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याची चर्चा सध्या सर्वत्र आहे.
2003 मध्ये पृथ्वीराज जाचक व दत्तात्रय भरणे हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत एकाच पॅनल मधून निवडून आले होते. अशा स्थितीत अध्यक्ष पदाला अचानक दत्तात्रय भरणे यांचे नाव पुढे आल्याने पृथ्वीराज जाचक हे नाराज झाले. त्यानंतर त्यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक ही लढवली.
भरणे छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष झाले पासून जाचक व भरणे यांच्यात नेहमीच दुरावा राहिलेला आहे. त्यानंतर भरणे यांनी जवळपास चार विधानसभा निवडणुका लढवल्या. या चारही निवडणुकीत जाचक यांनी भरणे यांना साथ दिली नव्हती.
मात्र आता जवळपास 22 वर्षाच्या कालावधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या असलेल्या जय भवानी माता पॅनलच्या माध्यमातून जाचक व भरणे एकत्र आले आहेत. आता त्यांच्यातील दुरावा संपून गोडवा वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.
जाचक यांनी श्री भरणे यांना लाडू पेढे भरवल्याचे फोटो सोशल मीडिया वरती वायरल झाले आहेत. त्यामुळे या पॅनलच्या माध्यमातून जाचक यांना छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष करून श्री भरणे यांनी एक प्रकारे बेरजेचे राजकारण केले आहे.
त्यामुळे श्री जाचक यांनी श्री भरणे यांना भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार ? की फक्त कारखान्याचे निवडणुकीपर्यंत टिकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.