भवानीनगर ता. 4 : आगामी काळात स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याची अपेक्षा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला इंदापूर व बारामती तालुका कार्यक्षेत्र असलेल्या त्यांच्याच बालेकिल्ल्यातील छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्षाचा आधार घ्यावा लागला आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक या तिघांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय जय भवानी माता निवडणुकीच्या रिंगणात उतरावा लागला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द मुळात या कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झाली आहे. सध्या देखील या कारखान्यावर उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्याच पॅनलची सत्ता होती. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याऐवजी सर्वपक्षीय पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे. त्यामुळे याची चर्चा सध्या राज्यात होत आहे.
वास्तविक आगामी काळातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वबळावर या कारखान्याची निवडणूक लढवेल व आपल्या जास्तीत जास्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी देईन. अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती.
मात्र बारामती व इंदापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पवार यांच्या बालेकिल्ल्यातच पवार यांना या कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभा करण्यासाठी सर्व पक्षीयाचा आधार घ्यावा लागला आहे. याचेच आश्चर्य सर्वांना वाटत आहे.
तसेच सर्वपक्षीय पॅनल मुळे इतर पक्षांनाही पॅनल मधील 21 जागांपैकी काही जागा सोडाव्या लागल्यामुळे विशेष करून बारामती व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक वर्ष उमेदवारीची वाट पाहत असलेल्या निष्ठावंतांना उमेदवारी पासून दूर राहावे लागले आहे.
त्यामुळे श्री पवार यांच्या पक्षाला बालेकिल्ल्यातच सर्वपक्षीय पॅनल उभा करावा लागल्याने याचा राज्यभर काय संदेश जाणार ? याचीच सर्वत्र चर्चा आहे.