मुंबई /पुणे, दि.२० सप्टेंबर : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः शेतकरी म्हणून आपली ओळख जपत आज इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या त्यांच्या गावी शेतकऱ्यांसोबत बैलपोळा उत्सव साजरा केला. ग्रामीण भागातील श्रमसंस्कृती, मातीशी असलेली नाळ आणि बैलांवरील प्रेमाचे दर्शन घडवणारा पारंपरिक बैलपोळा उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडींची पारंपरिक सजावट केली. रंगीबेरंगी कापड, फुलांचे हार, गोंडे, घुंगरं आणि फेट्यांनी सजवलेल्या बैलजोड्या गावभर मिरवणुकीत निघाल्या. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या वेळी गावकऱ्यांशी संवाद साधत बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या श्रमांचा आणि बैलांवरील प्रेमाचा उत्सव असल्याचे सांगितले.
“मी स्वतः शेतकरी असल्याचा अभिमान बाळगतो. शेती क्षेत्रात कितीही तंत्रज्ञान आलं तरी बैलांशिवाय शेती अपुरी आहे. त्यांचे श्रम आपण मान्य केले पाहिजेत. बैलपोळा हा शेतकऱ्याच्या जीवनातील कृतज्ञतेचा दिवस आहे. आज भरणेवाडीच्या शेतकरी ग्रामस्थांसोबत दरवर्षीप्रमाणे बैलपोळा साजरा करताना मला अतिशय आनंद झाला. मी राजकारणात येण्यापूर्वीपासून गावात बैलपोळा उत्सवात सहभागी होत आहे. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी या सणा सोबत जोडल्या गेल्या आहेत. बैलांना सजवून, पूजा करून त्यांची गावभर आदरपूर्वक मिरवणूक काढण्यात एक वेगळीच मजा आहे. घरात बैल असणं म्हणजे साक्षात शिवशंकर असण्यासारखं आहे. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला कृषी मंत्री करण्यात या माझ्या बैलांचं मोठं योगदान आहे असा मी मानतो,” असे भरणे म्हणाले.
ग्रामस्थांनी कृषी मंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच महिलांनी बैलांच्या आरत्या करून मंगलगीत गायले, तर युवकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, युवक मंडळ तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.