मुंबई /अहिल्यानगर : “१३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान पडलेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे ७५५ गावांना फटका बसला असून ३ लाख २३ हजार १९६ शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यात प्रामुख्याने खरीप पिकांचं नुकसान झालं असून प्राथमिक अंदाजानुसार २ लाख २९ हजार ९७ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं आहे. सरकारने काल काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १४० शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून ७१ हेक्टरवरील क्षेत्र बाधित होतं. त्यानुसार पंचनामे पूर्ण करून ६ लाख ३० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.” अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज अहिल्यानगरच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील भगुर आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावांना भेट देत आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची थेट शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांची परिस्थिती कृषीमंत्र्यांसमोर मांडली. सतत पडत असलेल्या पावसामुळे धरण ओवरफ्लो झालेत तर नद्यांना पूर आल्याने अनेक गावांना याचा फटका बसला आहे. पाहणी दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात झालं असून ९ पैकी ८ मंडलांत अतिवृष्टी झाली. तेथील टाकळी व खरवंडी या दोन मंडलात १५५ मिमी पावसाची नोंद आहे. पाथर्डी तालुक्यात तब्बल ७७ हजार १५५ हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. यामध्ये १३७ गावांमधील १ लाख १ हजार ५८० शेतकऱ्यांचं नुकसान झाला आहे. पुराच्या पाण्याने पाथर्डीतील पूल, रस्ते वाहून गेले आहेत. मुसळधार पाऊसमुळे जिल्ह्यातील सीना, खैरी, ढोरा, नंदिनी नद्यांना पूर आल्याने अनेक गावे आपत्तिग्रस्त झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतात, घरात पाणी घुसल्याने प्रचंड हानी झाली आहे. राज्यावर ओढावलेलं हे मोठ्या संकट असून शेतकऱ्यांनी धैर्याने काम घेण्याची आवश्यकता आहे. राज्य शासन सातत्याने मदत निधी जाहीर करत आहे. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यात माहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ९९ हजार ८१८ हेक्टर म्हणजेच ७ लाख ४९ हजार ५४५ एकर क्षेत्र बाधित झालं आहे. यात फक्त सप्टेंबर महिन्यातच २ लाख ५३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. राज्याचा विचार करता, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर बाधित क्षेत्र आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, फळपिके, मका, इत्यादी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेगाव, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या तालुक्यांचं मोठं नुकसान झालं आहे.