इंदापूर .ता ३१ : इंदापूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ०४८ हेक्टर उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे ऊस ज्यादा कारखान्याला गाळपाला आल्याशिवाय कोणत्याच कारखान्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे प्रत्येक साखर कारखाना सध्या आपल्या उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन नोंदी घेण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यात उसाची पळवा पळवी होणार आहे. त्याचबरोबर कारखान्याचा बाजारभावही महत्त्वाचा ठरणार आहे.
तालुक्यात गतवर्षी ३० हजार २०१ हेक्टर गाळपासाठी ऊस उपलब्ध होता यंदा मात्र २७ हजार १५३ हेक्टर ऊस नोंद असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे इंदापूर तालुक्यात तीन सहकारी व एक खाजगी असे चार साखर कारखाने आहेत त्यांची कारखान्यांची गाळप क्षमता चांगली आहे मात्र सर्वच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता कमी आहे. गेल्या वर्षी चांगली उपलब्ध असतानाही मार्च अखेरच तालुक्यातील बहुतांशी साखर कारखाने बंद झाले होते
यंदा मात्र गेल्या वर्षी पेक्षाही अंदाजे तीन लाख टन ऊस कमी आहे या तालुक्यात या चार कारखान्याबरोबरच जवळपास आठ खाजगी कारखाने ऊस घेऊन जातात. अशातच सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तालुक्यातील जनावरांची संख्या जास्त असल्याने सध्या गुरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग ऊस घालत आहे त्यामुळे हंगाम सुरू होईपर्यंत चालू आकडेवारी पेक्षाही उसाचे क्षेत्र आणखी कमी होणार आहे.या परिस्थितीमुळे कारखान्यांनी ठेवलेले गाळपाचे उद्दिष्ट या वर्षीच्या गळीत हंगामात पूर्ण करणे मुश्किल होणार आहे
त्यामुळे सर्वच कारखाने कार्यक्षेत्राच्या बाहेरील ऊस गाळपासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत यासाठी सर्वच कारखाने वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन उसाच्या नोंदी घेत आहे. अशातच यावर्षी उसाची उपलब्धता कमी असल्याने शेतकरीही जो जादा दर देईल त्याला ऊस देण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या भूमिकेलाही यावर्षी महत्त्व प्राप्त झाले आहे.