भिगवण ता. 24 : किशोरवयीन मुले मुली यांनी अनावधानाने झालेली चुका घरातील आई-वडिलांना सांगितल्या तर आई वडील माफ करू शकतात परंतु सदर चुकांचा दुसऱ्याने गैरफायदा घेतला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात तसेच शालेय जीवनामध्ये आपले आदर्श कोण असले पाहिजे हे सर्वात महत्त्वाचे आहे चांगले आदर्श ठेवून भावी वाटचाल केली तर भविष्य चांगले होऊ शकते परंतु आदर्श चांगले नाही ठेवले तर येणारा काळ अंधकारमय होऊ शकतो असे प्रतिपादन इंदापूर न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वानंदी वडगांवकर यांनी व्यक्त केले..
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तालुका विधीसेवा समिती इंदापूर व तालुका वकील संघ इंदापूर आणि भिगवन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कॉमन मिनिमम कार्यक्रमांतर्गत भिगवण येथील श्याम गार्डन मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या कायदेशीर शिबिरामध्ये भिगवण परिसरातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर अध्यक्ष पदावरून बोलताना त्यांनी व्यक्त केले..
पुढे न्यायाधीश वडगावकर यांनी सांगितले की कायद्यातील अज्ञान हा बचाव कायद्याला मान्य नाही त्यामुळे कायद्याचे ज्ञान तळागाळात पोहोचले पाहिजे. सध्या कायद्याच्या चौकटीत विचार करता समाजातील सर्वात असुरक्षित घटक हा किशोरवयीन असून या वयात घरातील आई-वडील हे शत्रू वाटतात बाहेरचे आदर्श वाटायला लागतात परंतु या वयामध्ये सत्संद विवेक बुद्धी जागृत ठेवून सामाजिक भान ठेवून विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे तसेच सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करणे गरजेचे आहे सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियामुळे अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यातूनही त्याचा चांगला वापर करून आपले भविष्य उज्वल करावे तसेच रस्ते अपघाताबाबत सर्वांनी नियमांचे पालन करून आपल्यामुळे इतर कोणाच्याही जीवित्ताचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन रस्त्यावरील नियमांचे पालन करावे असे मत व्यक्त केले
सदर कायदेविषयक शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे साहेब यांनीही विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश वकील व पोलीस या सर्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन विद्यार्थ्यांनीही भविष्य काळामध्ये भारताचा चांगला नागरिक बनण्यासाठी योग्य प्रकारे वाटचाल करून आपले भविष्य घडवावे समाजामध्ये चाललेल्या गैरप्रकाराकडे न पाहता चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा सोशल मीडियाचा व किशोरवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्याचा तपशील तसेच अपघाताबाबतही योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले सदर कायदेविषयक शिबिरामध्ये इंदापूर न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश के सी कलाल यांनी वाहतुकीचे नियम याविषयी मार्गदर्शन केले तसेच ॲड शरद जामदार यांनी पोस्को कायदा या विषयी मार्गदर्शन केले तसेच ॲड आशुतोष भोसले यांनी सायबर गुन्हे याबाबतचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रमासाठी इंदापूर न्यायालयातील ज्येष्ठविधीज्ञ ॲड कृष्णाजी यादव ॲड एन एस शहा ॲड मधुकर ताटे ॲड दिलीप गिरंजे ॲड रणजित चौधरी .ॲड शिवाजी नगरे ॲड श्याम शिंदे ॲड संजीव मोरे ॲड.रणजीत शितोळे ॲड सुभाष भोंग् ॲड.स्वप्निल जगताप ॲड.संदीप बांदल ॲड.सुधीर वाकळे ॲड.ज्योती जगताप तसेच अनेक वकील उपस्थित होते
सदर कार्यक्रमासाठी भिगवन परिसरातील सर्व शाळातील विद्यार्थी शिक्षक पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.माधव शितोळे देशमुख यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघटनेचे सचिव ॲड.असिफ बागवान यांनी केले व आभार ॲड.पांडुरंग जगताप यांनी मांडले