पळसदेव ता. 24 केंद्र शासनाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यामध्ये तालुका, गावपातळीवरील लोकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.आज पळसदेव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच लाभार्थ्यांना लाभाचे पत्र दिले.
यावेळी शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व घटकांतील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या उपक्रमात शासनाच्या योजनांच्या लाभांपासून जे लोक वंचित राहिले आहेत, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी गावागावांत जनजागृती करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने या यात्रेचा प्रवास सुरू आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’विकसित भारत संकल्प यात्रा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. इंदापूर तालुक्यातील ३६ गावात ही यात्रा पोहचली असून उर्वरीत गावात २६ जानेवारी पूर्वी ही यात्रा दाखल होणार आहे.आज या ठिकाणी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या मंजुरीचे पत्र देण्यात आले यामध्ये संजय गांधी निराधार योजना, आयुष्मान भारत योजना, रेशन कार्ड देण्यात आली. केंद्र शासनाच्या 57 विभागाच्या वतीने हा थेट लाभ नागरिकांना होत आहे.या देशाला जगामध्ये पुढे नेण्याची क्षमता विश्वव्यापी नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्यात आहे याचा विश्वास नागरिकांना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी प्रयत्नानेच केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात करोडो रुपयांचा लाभ मिळत असून विकसित भारत यात्रेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद काळे यांनी केले.