इंदापूर ता.28 : नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील उन्हाळी हंगामातील शेती सिंचनासाठी दोन आवर्तने दिली जातील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
24 फेब्रुवारीला पुणे येथे पालकमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रेय भरणे आमदार राहुल कुल,कार्यकारी संचालक अतुल कपोले पुणे पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री गुलाने सर अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार सर जिल्हाधिकारी सुहास दिवसे व इतर पाटबंधारे अधिकारी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आम्दार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावीत अशी आग्रही मागणी केली होती.
यावेळी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन चार मार्चला सोडण्यात येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले मात्र दुसऱ्या आवर्तनाबाबत खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन श्री भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री पवार यांनी दिली.
मात्र 25 फेब्रुवारीला इंदापूर येथे संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री पवार यांनी थेटच शहरी व ग्रामीण भागाचा समन्वय साधत खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी खडकवासला कालव्यातून दुसरे आवर्तन दिले जाईल त्या पद्धतीने पाण्याची नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आपण दिले आहेत असे श्री पवार यांनी या शेतकरी मेळाव्यात सांगितले.
त्यामुळे खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये श्री पवार यांच्या या घोषणेमुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.