….पावसाळ्याची रात्र होती. हत्ती नक्षत्राने चांगलंच मनावर घेतलं होतं .धप…. धप करत पावसाची मोठी सर येऊन गेली .अंगणामध्ये पाणी …पाणी झालं .पाऊस थोडा थांबला .परंतु बेडकांनी एकच सूर धरला होता. बेडकांच्या लयबद्ध सुरात एका कुत्र्याने त्याचा विव्हळण्याचा भेसूर सूर मिसळला .आणि मग वस्तीवरच्या सगळ्याच कुत्र्यांनी त्या विव्हळण्याच्या भेसूर सुरात आपलाही तसलाच सूर मिसळला. जणू त्यांची जुगलबंदीच सुरू झाली होती. अशातच रातकिड्यांची कीण कीण… वातावरणातील भेसूरता वाढवत होती. अशा भयंकर वातावरणात… मला एका मांजराच्या पिल्लाचा आवाज घराच्या खिडकीच्या जवळ ऐकू आला.
आपलं मांजर बाहेरच पावसात भिजते का काय? याची खात्री करण्यासाठी मी दार उघडून बाहेर आलो .तर एक मांजरींचं एक पिल्लू पावसाने भिजून कुड… कुड करीत निवारा शोधत पुढे सरकत होतं. त्याची अवस्था पाहून मला त्याची दया आली. मी एका कापडामध्ये त्याला अलगद उचलून, पुसून स्वच्छ केलं .थोडी उब देण्याचा प्रयत्न केला. भुकेलेलं होतं. थोडं दूध पाजले.
माझी पत्नी हे माझं हे सारं उपद्व्याप पाहत होती. अहो…… अगोदरच घरात एक मांजर आहे. एक कुत्रा आहे. याची आणखी भर कशाला टाकता. तीची व्यवहारिकता जागी झाली. मी म्हटलं, ” आजची रात्र ..या पिल्लाला निवारा देणे आपलं कर्तव्य आहे .सकाळ पाहू त्याचं काय करायचे ते. पिल्लू रात्रभर पोर्चमध्ये आडोशाला राहिलं. सकाळी उठलो. म्हशीचे धार काढली. बरोबर वाटीभर दूध घेतलं. पिल्लाला पिशवीत घेऊन थेट मी माझ्या डाळिंबाच्या बागेत गेलो. बागेच्या कडेला इतर झाडा – झुडुपात एक डोली वजा थोडा त्याला आसरा केला. एक पोत्याच्या तुकड्यावर त्याला तिथं सुरक्षित ठिकाणी बसवलं. वाटीभर दूध पाजलं .आणि मी घरी निघून आलो .
दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लाच्या ओढीने पुन्हा दूध घेऊन गेलो. पिल्लू त्याच ठिकाणी किंबहुना माझी वाटच पाहत बसलं असावं. माझ्या आवाजाने डोलीच्या बाहेर आलं. वाटीभर दूध पाजलं. मग,दररोज माझा तो दिनक्रमच राहिला. सकाळी उठायचं…. म्हशीची धार काढायची आणि त्या मांजराला दूध घेऊन बागेत जायचं. त्यानिमित्ताने बागेलाही माझी चक्करही होत होती.महिना दोन महिने असेच गेले. एव्हाना बागेला चांगली फळ धारणा झाली होती .सप्टेंबर महिन्यामध्ये रात्री मोठ्या पतंग माश्या फळांना दंश करून रसाचे शोषण करतात. या माश्याचे नियंत्रण करणे मोठे अवघड काम असते. कुणी शेतकरी रात्री ठेंभा करून.. उजेडाकडे आकर्षित झालेल्या माश्या मारतात. कुणी टेनिसच्या लाकडी बॅटने, कुणी काही- बाही उपाययोजना करून माश्या घालवण्याचा प्रयत्न केला जातो.
मी दररोज सायंकाळी टेबल टेनिस ची एक छोटी लाकडी बॅट घेऊन फळाच्या माशा मारण्याचा प्रयत्न करायचो. फळावरील माशी बॅटच्या साह्याने खाली पाडली की ते मांजर त्या माशीवर झडप मारायचं. तासाभराच्या या खेळांमध्ये पाच- पन्नास माशांचा तरी ते मांजर फडशा पाडायचं. तो बोका होता. मी त्याचं नाव “राजा” ठेवलं.
रोज बागेत गेलो ,आणि.. राज्या…… म्हणून हाक मारली की ,मी जिथे असेल तिथे तो म्याऊ म्याऊ करत पळतच यायचा. मी आणलेलं दुध वाटीत ओतताच डोळे झाकून घटघट प्यायचा. थोडा वेळ माझ्या पायांशी मस्ती खेळून थोडं थांबून तो पुन्हा बागेमध्ये शिकारीला जायचा. डाळिंबीच्या बागेचा तो अनभिषिक्त सम्राटच झाला होता. माझ्या हाकेनेच तो जवळ यायचा. मात्र इतर कोणाच्या जवळच जात नसायचा .बागेतील फळाला पोखरणाऱ्या माशा बऱ्याच प्रमाणात तो कमी करत असल्याने त्याची उपयुक्तता मला जाणवत होती. खाल्ल्या दुधाला तो जागत होता.
दिवस जात होते. बागेचा सिझन संपल्यानंतर सुद्धा मी नेहमी राजाला दूध घेऊन जात असे. आता तो बऱ्यापैकी मोठा झाला होता. छोट् -छोट्या शिकारी करण्यामध्ये तो तरबेज झाला होता. बागेत आलेले पक्षीही तो हुसकावून लावायचा. तो बागेचा चांगलाच पारेकरी झाला होता.
पुढील वर्षी मी बागेच्या शेजारी गव्हाचे पीक घेतले होते . एके दिवशी बागेच्या कडेने बांधावरून मी जात होतो. राजा माझ्या आजूबाजूलाच होता
माझ्यासमोर पंचवीस फुटावर राजाचे लक्ष गेलं. मी ज्या वाटेने चालत होतो. त्या वाटेवर एक साप आडवा दत्त म्हणून पहूडला होता. त्याच्याकडे माझे लक्ष गेलेले नव्हते. राजाने एकाएकी विजेच्या चपळाईने त्याच्यावर झडप मारली. तो सावध होत.
प्रतिकाराऐवजी माझ्या चाहुलीने गव्हाच्या पीकात शिरला राज्याने त्याचा पाठलाग सोडला नाही. तो ही गव्हात गेला. बराच वेळ त्यांची झटापट सुरू होती. शेवटी राज्याने त्याचे काम अचूक केले.
आता तर, राज्याचा मला चांगलाच लळा लागला होता. दररोज त्याला दुधाचा रतिब होताच. दूध त्याला भेटण्याचे निमित्तमात्र होते.बाकी त्याचा उदरनिर्वाह शिकारीवरच चालायचा. बाग मात्र त्याने सोडली नाही.
एके दिवशी मी आजारी पडलो. मला बारामतीला चार-पाच दिवस ऍडमिट व्हावं लागलं. या काळामध्ये बागेत कोणी गेलं नाही. अशा अवस्थेतही मला त्याची काळजी लागायचच. चार-पाच दिवसांनी मी पुन्हा दवाखान्यातून घरी आलो. घरी येताच तशा अवस्थेतही राज्याला दूध घेऊन बागेत गेलो.एका हाकेला धावत येणारा राज्या…अनेक हाका मारुनही आला नाही . आजुबाजुलाही मी खूप शोधले. परंतु काही तपास लागला नाही. बहुदा तो माझी वाट पाहून ..पाहून माझ्या शोधासाठी त्याने बाग सोडली असावी.
..आता तेथील डाळिंबाची बाग झाडांचे वय झाल्याने काढून टाकली आहे.मात्र “राज्या “साठी झाडा-झुडपात केलेली डोली व राज्याची दूध पिण्याची वाटी आजही तिथेच आहे. कधी मी तिथं गेलो तर ..आजही माझी नजर नकळत राज्याच्या शोधात भिरभिरते.
तानाजी काळे, पत्रकार
पळसदेव ता.इंदापूर
9423534515
************************