पुणे ता. 18 : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाचे प्रलंबित प्रश्न न सोडविल्यास , पुढे दोन टप्प्यात आंदोलन केले जाईल. असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिला.
पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ , सरचिटणीस संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( १७ जुलै रोजी ) जिल्हा परिषद पुणे मुख्यालयाच्या समोर पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्रलंबित प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले .
यावेळी होळकर बोलत होते. या प्रसंगी जिल्हा शिक्षक समितीचे नेते शरद निंबाळकर,पुणे विभागीय संघटक चंद्रकांत डोके, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी , कोषाध्यक्ष सुनील लोणकर, उपाध्यक्ष विश्वनाथ कौले ,संपर्कप्रमुख बापू जाधव, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा प्रियतमा दसगुडे, सरचिटणीस मधुबाला कोल्हे व सर्व तालुका अध्यक्ष, तालुका, जिल्हा पदाधिकारी , शिक्षक ,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला , पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चर्चेसाठी बोलावले. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी मुख्याध्यापक आणि पदवीधर प्रमोशन बाबत न्यायालयामध्ये गेलेल्या शिक्षकांना बोलावून घेऊन त्यांची एक बैठक तातडीने घेण्यात यावी ,असे आदेश त्यांनी शिक्षण विभागास दिले.
केंद्रप्रमुख पदोन्नती कार्यवाही चालू असून लवकरच केंद्रप्रमुख पदोन्नतीच्या रिक्त जागा भरल्या जातील.विविध थकीत पुरवणी बिलासाठी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे दहा कोटींची मागणी केलेली असून सन 2022-23 च्या फंड स्लीपा एक आठवड्यात दिल्या जातील.फंड कर्ज प्रकरणे शिक्षण विभागाने मंजूर केल्यानंतर पुन्हा पंचायत समितीला परत पाठवण्याचा टप्पा रद्द करण्याबाबत जिल्हा परिषद कॅफो यांच्याशी बोलून सोडवण्यात येईल.
सातव्या वेतन आयोगाचा दुसरा- तिसरा व चौथा हप्ता ,त्याचबरोबर डीसीपीएस शिक्षकांना देण्यात येणारी रोख रक्कम याचा सर्व पाठपुरावा राज्य सरकारकडे करण्यात येईल.
निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांची यादी करण्याच्या व वैद्यकीय बिले मंजूर होण्यास उशीर का लागतो याची माहिती घेण्याच्या सूचना शिक्षण विभागास देण्यात आल्या.
जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेत हजर असलेल्या कालावधीसाठी उपस्थिती प्रमाणपत्र देण्याच्या सूचना शिक्षण विभागातील अधिकारी यांना आयुष प्रसाद यांनी दिल्या .
आंदोलनावेळी सर्व तालुका अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी सूत्रसंचालन आप्पासाहेब मेंगावडे यांनी केले तर आभार सुनील कुंजीर यांनी मानले.