इंदापूर ता.18 : राज्यातील महा युतीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) सहभागी झाला. आणि खातेवाटप झाल्यानंतर राज्याच्या अर्थ खात्याची अर्थात तिजोरीची जबाबदारी पवार यांच्याकडे आली. मात्र तिजोरी जरी राज्याची असली तरी या तिजोरीच्या चावीवरून वरूनच माजी मंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
राज्यात अजितदादा गट सत्तेत सहभागी झाला. आणि दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले. अशाच उत्साहाच्या वातावरणात इंदापुरातील एका कार्यक्रमात माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजितदादा अर्थमंत्री झाल्याने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दादांकडे आहेत. त्यामुळे काळजी करू नका. असे जाहीर कार्यक्रमातून सांगितले होते.
या वक्तव्यास दोन दिवस होत नाही तोच आज इंदापूर येथे राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याची तिजोरी ही आमची आणि त्या तिजोरीच्या मास्टर चाव्याही आमच्याकडेच आहेत. असे जाहीरपणाने सांगत भरणे यांनी केलेल्या तिजोरीच्या चावीला आपली ही मास्टर चावी लावली.
या तिजोरीच्या चावी वरून व या तिजोरीतून आलेल्या रस्त्यांच्या निधीवरून इंदापुरात कलगीतुरा सुरू झाला आहे. याचाच पहिला पहिला प्रत्यय पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या पुरवणी तरतुदीत रस्त्यांच्या कामासाठी करण्यात आलेल्या निधीवरून आला आहे.
भरणे यांनी रस्त्यांसाठी 37 कोटीचा तर पाटील यांनी 29 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. परंतु दोघांनीही प्रसिद्धीला दिलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये काही नावे समान आहेत.
त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या निधीच्या श्रेयात व संभ्रमात न पडता आपल्या तालुक्याचे दोन्ही नेते आपल्या तालुक्यासाठी राज्याच्या तिजोरीच्या माध्यमातून निधी आणत असल्याने तालुक्यातील जनता व मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अशातच 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे यास केवळ एक वर्षाचा काळ उरला असल्याने या पार्श्वभूमीवर तालुक्यात तिजोरीच्या चावीच्या चर्चेवरून रंगलेल्या कलगीतुऱ्याला विशेष महत्त्व आहे.
त्यामुळे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या व मास्टरच्या व्या जरी तालुक्यातील या दोन माजी मंत्र्यांकडे असल्या तरी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातून विधानसभेत नेतृत्व करण्याची चावी कोणाच्या हातात देणार याकडे मात्र राज्याचे लक्ष लागले आहे.