भवानीनगर ता.19 : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची 12 जुलै रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.
या यादीवर हरकती घेण्यासाठी सभासदांना फक्त दोन दिवस अर्थात 20 जुलै पर्यंतची मुदत उरली आहे.
या कालावधीत दाखल होणाऱ्या हरकतीच्या मुद्द्यावरूनच कारखान्याच्या आगामी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मागील तीन वर्षांपूर्वीच संपलेली आहे. तीन वर्षांपूर्वीच निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याच कालावधीत सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती.
मात्र सहकार विभागाने कोरोना परिस्थितीमुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. याचा फायदा संचालक मंडळाला झाला. व या संचालक मंडळाला मुदतवाढीचा बोनस मिळाला.
त्यानंतर प्रारूप याद्यावर थकबाकीदार क्रियाशील अक्रियाशील सभासदांच्या मुद्द्यावरून दाखल झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती
. मात्र न्यायालयाने यावर निर्णय देत आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
यानुसार श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी 12 जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर हरकती घेण्यासाठी सभासदांना उद्या अर्थात 20 जुलै पर्यंतची अंतिम मुदत आहे.
मागील वर्षी ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर दाखल झालेल्या हरकतींमुळे अनेक सभासदांनी न्यायालयात धाव घेतली होती.. या लढाईमुळे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया थांबली होती.
त्यामुळेच आताही प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर 20 जुलै पर्यंत कोणकोणत्या व कोणत्या स्वरूपाच्या हरकती मतदार यादीवर दाखल होतात. याला विशेष महत्त्व आहे.
दाखल झालेल्या हरकती व आक्षेप यावर 28 जुलै रोजी कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने निर्णय दिला जाणार आहे. त्यातून समाधान न झाल्यास दोन्ही बाजूचे सभासद पुन्हा न्यायालयात जाणार का ? हा देखील उत्सुकतेचा विषय आहे.
तर 2 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रक्रियेला गती येणार आहे. मात्र विद्यमान संचालक मंडळाला जवळपास सव्वातीन वर्षाचा मिळालेला मुदतवाढीच्या बोनस आणखी वाढणार का ?
तत्काळ दोन ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक लागून संपुष्टात येणार ? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.
मात्र सध्या तरी सव्वा तीन वर्षाचा मिळालेल्या मुदत वाढीचा बोनस सर्वाधिक विद्यमान संचालक मंडळाच्या व त्यानंतर सभासदांच्या आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे.