इंदापूर ता 7 : आदरणीय दादा रब्बी हंगामातील पिके जळायला लागली…. रब्बी हंगाम संपत आला…. तरीही अद्याप खडकवासला कालव्याला आवर्तन न सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अजित दादा पवार कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त कधी काढणार ? याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा खडकवासला प्रकल्पातील धरणे शंभर टक्के भरूनही केवळ सहा दिवसाचे कागदोपत्री नावाला इंदापूर तालुक्याला आवर्तन आले आहे. कालवा बंद होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आला तरी इंदापूर तालुक्याला आवर्तन नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे अशातच रब्बी हंगामातील पिके ही जळण्याच्या मार्गावरती आहेत. तसेच लाभ क्षेत्रात असणाऱ्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जवळपास नोव्हेंबर अखेर होती. त्यामुळे खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले मंत्री कामकाजालाही लागले. परंतु तरीही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने अद्याप खडकवासला कालव्याला आवर्तन सोडलेले नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके सध्या जळण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला पालकमंत्री कधीच मुहूर्त काढतात ? व शेतकऱ्यांना कधी पाणी देतात ? याकडे इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.