भिगवण ता.23 : येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विदयार्थी आदित्य आशिष कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले. अशी माहिती मुख्याध्यापिका सौ. सुचिता साळुंके यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर व ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड तसेच अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा २०२६-२७ जामखेड, अहिल्यानगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत पुणे विभागातील जिल्हयांचे संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत आदित्य कुंभार याने १७ वर्ष वयोगटातील ६५ किलो वजन गटात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. आदित्य कुंभार याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत फायनलपर्यंत धडक मारली. फायनलमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
या स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले. त्याला प्रशिक्षक गणेश घुले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
आदित्य कुंभार याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, संस्थेचे सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.







