डॉ. संदेश शहा, पत्रकार
इंदापूर, ता २१ : कर्नाटक मधील जैन आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील सकल जैन समाजाने आज (दि.२०) इंदापूर तालुका बंद ठेवत, इंदापूर तहसील प्रशासकीय भवनावर निषेध मोर्चा काढला. यावेळी खुनी सूत्रधारास तातडीने अटक करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, जैन धर्मगुरू तसेच आश्रम, गुरुकुल व संस्थांना पोलीस संरक्षण द्यावे, जैन तीर्थक्षेत्रावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाने समयोचीत पाऊले उचलावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयास देण्यात आले.
सकाळी दहा वाजता संपूर्ण तालुक्यातील सकल जैन श्रावक व श्राविका जुन्या तहसील कार्यालयाजवळ संभाजी चौकातील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे एकत्र जमले. तेथून शहर मुख्य बाजार पेठ, जुन्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन प्रशासकीय भवनासमोर आल्यानंतर मोर्चाचे निषेधसभेत रुपांतर झाले. तेथे ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा, श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, भिग वण चे अध्यक्ष महेंद्र बोगावत, संजय रायसोनी, सारिका गांधी, अभय गांधी यांची भाषणे झाली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल संघाचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, नितीन शहा, शेखर दोशी,पारसमल बागरेचा, निलेश मोडासे, प्रकाश बलदोटा, महेंद्र गुंदेचा, जवाहर बोरा, डॉ.अनंग मेहता, संजय बोरा, निकिता दोभाडा, महावीर गांधी, हुकुमचंद बोरा, संदीप दोशी, वैभव दोशी, सचिन गांधी, अक्षय दोशी, पंकज दोशी, डॉ.अतुल कोठारी, संतोष व्होरा, विपुल व्होरा, धर्मेंद्र गांधी, स्वप्नील दोशी, अमोल डूडू, अजित दोशी, महावीर शहा यांच्यासह तालुक्यातील सर्वच भागामधील जैन बांधव व भगिनी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. श्रेणिक शहा म्हणाले, अहिंसा तत्वाचे पालन करणारे जैन साधू कधी ही कुणावर हल्ला करत नाहीत, छोटयात छोटया जीवाची देखील हिंसा होवू नये म्हणून ते आचरण करतात. प्रवचनामधून ते राष्ट्र उभारणी, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्ती, शाकाहार व अहिंसेचे उद्बोधन करतात. चोवीस तासांतून एकदाच अन्न व जलाचा स्विकार करणा-या अशा धर्मगुरूंची हत्या ही अत्यंत निंदनीय घटना आहे. त्या घटनेमागचा सूत्रधार पकडुन सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
मोर्चाच्या निमित्ताने पंतप्रधानांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना,त्यांना रस्त्यामध्ये असणा-या शाळा वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षण खात्याकडून नियमात सुधारणा करण्यात यावी, जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना काही समाज कंटका कडून जैन गुरूंवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये हजारो धर्मगुरू याचे बळी पडले आहेत. त्यामुळे धर्मगुरूंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दीपासून ते दुस-या गावाच्या हद्दीपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली असल्याची माहिती डॉ. विकास शहा यांनी केली.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विशाल बोंद्रे म्हणाले, देश विकासात जैन धर्माचे मोठे योगदान असून या दुर्दैवी घटने मुळे जैन समाजावर मोठे धर्मसंकट आले आहे. शासनाने जैन समाजास योग्य न्याय देणे ही काळाची गरज आहे.
—————————————-