शेटफळगडे ता. 21 : खडकवासला प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या बारामती दौंड इंदापूर या तिन्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी सध्या सत्तेत आहेत. अशातच या तिन्ही तालुक्यात सध्या पाऊस नाही.
मात्र समाधानाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आज अखेर जवळपास प्रकल्पात 45.93 टक्के अर्थात 13.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या पाणी साठ्यात प्रति दिवसाला वाढ होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या आपल्या शेतातील पिके वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने खडकवासला कालव्याला आवर्तनाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष या तिन्ही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लागले आहे.
सध्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. सद्य स्थितीला खडकवासला धरण साखळीत आज अखेर जवळपास 45.93 टक्के, पाणी साठा जमा झाला आहे. तसेच धरण क्षेत्रात . संततधार पाऊस सुरू आहे.
गतवर्षी वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मिळून गतवर्षी आजच्या तारखेला 67.73 टक्के, तर 19.74 टीएमसी जमा होता. तर यंदा आजच्या तारखेला 45.93 टक्के, तर 13.38 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे. तसेच मागील 24 तासा पासून धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने प्रति तासाला या प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
तसेच यापुढील काळातही प्रतिदिवशी या पाणी साठ्यात वाढ होणार आहे त्यामुळे अनेक वर्षांचा अनुभव पाहता खडकवासला प्रकल्प 100 टक्के भरल्यावरती व प्रकल्पातील सर्वात छोटे असणारे खडकवासला धरण भरल्यावरती खडकवासला कालवा सुरू असल्याने व क्षमतेपेक्षा जास्त कालव्याला पाणी सोडता येत नसल्याने नदीला पाणी सोडून द्यावे लागते.
अशातच सध्या खडकवासला प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील बारामती दौंड इंदापूर या तिन्ही तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत. उसाच्या लागणी देखील झालेले नाहीत. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्या नवा मुठा उजवा खडकवासला कालव्याला तत्काळ पाणी सोडणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष या तिन्ही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींकडे लागले आहे.
अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व आमदार राहुल कुल हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. व शेतकऱ्यांना मदत करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या गरजेच्या असणाऱ्या खडकवासला कालव्याच्या आवर्तनाच्या बाबतीत हे तिन्ही लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार ? व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याच्या सूचना देणार का ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .
—————————————-