इंदापूर : दि.23 : इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव ते नीरा नरसिंहपूर पर्यंतच्या विविध ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजना ह्या भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांना पाणी उपलब्धतेसाठी टणू, भाटनिमगाव व शेवरे बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे शुक्रवारी (दि. 22) केली.
या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क केला असून मागणीचे पत्रही पाठविले आहे. याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
भीमा नदीमध्ये सध्या उजनी धरणातून सोलापूर – पंढरपूर शहराला पिण्यासाठी तसेच भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये भीमा नदीवरती भाटनिमगाव, टणू, शेवरे (नरसिंहपूर) या ठिकाणी 3 मी. उंचीचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्याच्या पाण्यावरती श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर, टणु, पिंपरी बु., गिरवी, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, सुरवड, भाटनिमगाव, बेडसिंग, बाभूळगाव, हिंगणगाव आदी अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी, सदरच्या बंधाऱ्यांमध्ये किमान 1.5 मी.उंची एवढ्या पाण्याची साठवण करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, भीमा नदीवरील टणू, भाटनिमगाव व शेवरे बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी धिरज साळे (अधीक्षक अभियंता) तसेच सा.क.हारसुरे (कार्यकारी अभियंता) यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.
___________________________