मुंबई: राज्यातील 2023-24 गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी (19 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मिळाला आहे.
दोन वेळा पूर्वनियोजित होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली. अखेरीस 19 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यात यंदा 14 लाख 7 हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून 1 हजार 22 लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा 88.58 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 87 हजार हेक्टर ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.