पुणे, दि- ४ : पहाटे सहा-साडेसहाची वेळ… हिवाळ्याची चाहूल लागल्याने अनेक पुणेकर व्यायामासाठी बाहेर पडलेले… त्याचवेळी हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ करण्याची सफाई कामगारांची लगबग… पुण्यात रोजच दिसणारे हे दृश्य मात्र, शनिवारची पहाट त्याला अपवाद होती. बाकी सारे तसेच असले, तरीही एरव्ही हातात झाडू असलेल्या सफाई कामगारांच्या हाती मात्र दिवाळी अंक दिसत होता…..
निमित्त होते, हार्ट पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या विनर्स’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) शनिवारी पहाटे साडेसहा वाजता सफाई कामगारांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले यावेळी सफाई कामगार ज्योती ओव्हाळ, अनिता जाधव, रेखा अडागळे, सविता भणगे यांसह मुकादम सोहम जाधव, राहुल वाघमारे, मनोज भिसे, गोविंद राऊत, दत्तात्रय लोटे, अतुल लोणारे, अंकाचे संपादक उत्तमकुमार इंदोरे, प्रकाशक विनोद शिंदे व सरव्यवस्थापक नीलेश चांदगुडे उपस्थित होते.
राजकीय, सामाजिक, क्रीडा, उद्योग व मनोरंजन या क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींनी त्यांना यशस्वी केलेल्या व्यक्तीविषयी लिहिलेले लेख, आठवणी, मुलाखती या अंकात आहेत. निवडक कवींच्या कविता, छायाचित्रे, तसेच प्रेरणाचित्रेही या अंकात आहेत. त्यामुळे या अंकाचे प्रकाशन सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या हस्ते व्हावे, अशी संकल्पना राबविली गेली. दिवाळी अंकाच्या इतिहासात अशा प्रकारचे प्रकाशन हा पहिलाच प्रयोग आहे.
————————
काही संस्था आम्हाला भेटवस्तू देतात. सत्कारही करतात, पण आमच्या हातून एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन कधी कुणी केलं नाही. आम्हाला मिळालेली ही व्हीआयपीसारखी वागणूक पहिल्यांदाच पाहतो आहोत. – ज्योती ओव्हाळ, सफाई कर्मचारी
————————
फोटो ओळ : हार्ट पब्लिकेशनच्या ‘विनर्स’ या दिवाळी अंकाचे नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) शनिवारी पहाटे साडेसहा वाजता प्रकाशन करताना सफाई कामगार