इंदापूर ता. ६ : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
कोरोना पावसाळ्याचा कालावधी तसेच सभासदांच्या यादीवरील आक्षेप क्रियाशील अक्रियाशील सभासदात्वाचा मुद्दा या प्रमुख कारणांमुळे सुरू असलेली न्यायालयीन लढाई तीन वेळा पार पडलेली मतदार यादीची प्रक्रिया या व विविध कारणामुळे आजवर विद्यमान संचालक मंडळाला जवळपास पावणे चार वर्षाचा वाढीव कार्यकालाचा बोनस मिळाला आहे.
अशातच लोकसभेची मुदत येत्या मे 2024 मध्ये संपत आहे त्यामुळे येत्या 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत व तत्काळ देशभर आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता कमी आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागाचे सरकारी कर्मचारी हे लोकसभेच्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजात गुंतले जाणार आहेत.
त्यामुळे मनुष्यबळाच्या अभावी इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा आजवरचा इतिहास आहे. व तसे होळीच्या निवडणुकीचा इतिहास पाहता याबाबतचे शासन आदेशही निघालेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होणे अशक्य आहे.
त्यानंतर यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत देखील सहकारी संस्थांच्या निवडणुकींना स्थगिती दिली जाते व त्यानंतर जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याला सुरुवात होणार आहे पावसाळ्याच्या काळात देखील सहकारी संस्थांच्या निवडणुकींना स्थगिती दिली जाते असे आजवरचे शासनाचे आदेश आहेत अशातच अशातच विधानसभेचा नोव्हेंबर 2024 मध्ये कार्यकाल संपत आहे. त्यामुळे आगामी 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुक घोषित होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या कामकाजात सर्वच विभागाचे सरकारी कर्मचारी हे गुंतले जाणार असल्याने सरकारच्या वतीने अशावेळी इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकींना स्थगिती दिली जाते. त्यामुळेच विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतरच खऱ्या अर्थाने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीरची शक्यता आहे.
मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले तरच निवडणुकीची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. अन्यथा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने संचालक मंडळाला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.