शेटफळगढे ता. 1 : आपण जिथे आहे तिथे समाधानी आहे त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक आपण लढणार नाही. असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले .
लाकडी (ता. इंदापूर) येथे 30 डिसेंबर रोजी श्री भरणे यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात श्री भरणे यांचे भाषण सुरू असताना एकाने मामा तुम्ही खासदार व्हा असे म्हणाले. त्यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी माझे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठरले आहे. हे मी जाहीर न सांगता एकांतात व योग्य वेळ आल्यावर मीही सांगेन व तुम्हालाही समजेल. असे श्री भरणे यांनी उपस्थितांना सांगितले होते.
या संदर्भात चौफेर न्यूजने आमदार दत्तात्रय भरणे बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार…? या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली. यानंतर लगेचच श्री भरणे यांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू झाली.
यावर बोलताना श्री भरणे म्हणाले आपण कदापिही बारामती लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. मी सध्या जिथे आहे तिथे सुखी आहे तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी मला अजूनही काम करावयाचे आहे तालुक्याच्या व गावच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आपण आणत आहे. त्यातून तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर चालला आहे.. तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे काम मार्गी लागले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर यापुढील काळात तालुक्यातील 22 गावाचा शेतीच्या सिंचनाचा पाणी प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे . असेही श्री भरणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले