शेटफळगढे, ता 16 चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करा व इंदापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा खडकवासला कालव्याला आवर्तन सुरू असताना वीज पुरवठा खंडित करू नये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे द्यावेत निरगुडे येथे पर्जन्यमापक बसवावे या व इतर मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून निरगुडे (ता. इंदापूर) येथे उपोषणास बसलेल्या भगवान खारतोडे यांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळी भेट घेतली. व श्री खारतोडे यांच्याशी चर्चा केली परंतु ते उपोषणावरती ठाम आहेत.
श्री खारतोडे हे शेतकरी मागील सात दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न मार्गी लागावे यासाठी मागील सात दिवसापासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.त्यांनी उपोषण स्थगित करावे यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी भेट देऊन यापूर्वी विनंती केली होती. परंतु खारतोडे यांनी ती मान्य केली नाही.
उपोषणाच्या सातव्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री खारतोडे यांच्या उपोषण स्थळाला भेट देऊन श्रीखारतोडे यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मागणी संदर्भात चर्चा केली यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच सुळे यांनी फोन केला व स्वतः व शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदार इंदापूर यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात याबाबतचे सविस्तर मार्ग काढू असे सांगितले.
या दरम्यान जिल्हाधिकारी यांचा अभिप्राय येईपर्यंत आपण आपल्या तब्येतीसाठी उपोषण स्थगित करा व जिल्हाधिकारी यांना ही वेळ द्या असे सांगत श्री खारतोडे यांना स्वतः व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण स्थगित करावे. असे सांगितले. परंतु श्री. खारतोडे हे उपोषणावर ठाम राहिले आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्यासह नायब तहसीलदार अनिल ठोंबरे तालुका कृषी अधिकारी बी एस रुपनवर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकरी यावेळी उपस्थित होते.