शेटफळगढे ,ता 17 : गंभीर दुष्काळ जाहीर करा चारा छावण्या व चारा डेपो सुरू करा खडकवासला कालव्याचे आवर्तन चालू असताना विद्युत पुरवठा खंडित करू नये कांद्याच्या पिक विम्याचे पैसे द्यावेत या व इतर मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकरी भगवान खारतोडे यांची निरगुडे (ता. इंदापूर) येथे 16 जानेवारीला आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. त्याच्या मागण्या संदर्भात प्रत्येक अधिकाऱ्याला उपोषण स्थळावरून सर्वांच्या समोरूनच स्वतः फोन करून प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे भरणे मामांच्या या अनोख्या काम करण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी खुश झाले. मात्र उपोषण करणाऱ्या भगवान खारतोडे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
निरगुडे (ता इंदापूर ) येथील उपोषणास बसलेल्या शेतकऱ्याची मागणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन संबंधित बैठकीचे अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठवून ते प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना तहसीलदारांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी दूरध्वनी वरून दिल्या. तसेच कांदा पिकाचा पिक विमा तात्काळ देण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करून पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा करा अन्यथा आपल्या कंपनीला जबाबदार धरून कंपनीच्या विरोधात आपण स्वतः कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा भरणे यांनी यावेळी दिला. भरणे यांनी तब्बल दोन तास खारतोडे यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची श्री भरणे यांच्यासह ग्रामस्थांनी विनंती केली तरीदेखील उपोषण करते भगवान खारतोडे यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही.
यावेळी विजय भोसले, निवृत्ती सोनवणे, रामदास काजळे, युवराज भोसले, दादासाहेब भोसले, यशवंत केकाण, बाळासाहेब पानसरे,गोविंद गोसावी ,अशोक लकडे ,गणपत पानसरे ,उदय काजळे ,संदीप चांदगुडे , साधना केकाण, काका वाकडे, अर्जुन वाकडे, अमोल वाकडे, अनिल भोसले, संतोष रणधीर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.