भिगवण, दि. १ : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि कष्टकरी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली.
यानंतर प्रा. धनाजी मत्रे व डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांनी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. पद्माकर गाडेकर, डॉ. अनिल बनसोडे, प्रा. रोहन व्यवहारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश मोरे यांनी केले, तर प्रा. सारीका पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.







