इंदापूर ता. 25 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच पावसाळी अधिवेशानाच्या सुरवातीलाच मांडलेल्या पुरवणी मागण्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील आमदारांना भरभरून विकासनिधी देऊन त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली आहे.
त्यामुळे नविन सत्तांतरामध्ये सुध्दा राष्ट्रवादीच वरचढ ठरल्याचे विकासनिधीवरून दिसत आहे.तर अजित पवारांचा खास मर्जीतला आमदार म्हणून ख्याती असलेले इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना नेहमीप्रमाणे इतर आमदारांच्या तुलनेत सर्वात जास्त (४३६ कोटी) निधी मंजूर करत आ.भरणे यांना झुकते दिले आहे.
त्यामुळे आमदार भरणे यांनी विकासनिधी खेचून आणण्यात आपला दबदबा निर्माण केला आहे.
सध्या पावसाळी अधिवेशन चालु असून यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये असमान निधीच्या वाटपावरून आरोपांच्या फैरी झडत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र इतरांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांना झुकते माप दिले आहे.यंदाच्या पुरवणी मागण्यामध्ये सर्वात जास्त निधी भाजपाचे आमदार प्रशांत बंब (७४२ कोटी) यांना मिळाला आहे.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट) यांना सुमारे ५८० कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे असून त्यांनी ४३६ कोटी रूपयांचा निधी मिळवण्यात यश मिळवले आहे.
तर अजित पवार गटाचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी मिळवत दत्तात्रय भरणे यांनी अव्वलस्थान पटकावले आहे.त्यामुळे नविन सत्तेचे गणित जुळून अजून महिनाही उलटला नाही तोवर आमदार दत्तात्रय भरणे यांनी कोणताही गाजावाजा न करता अतिशय चाणाक्षपणे वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा इंदापूरसाठी आणायला सुरुवात केली आहे.
त्याची एकप्रकारे चुणूक या अधिवेशनात पहायला मिळत आहे.तसेच आ.भरणे हे निधीच्या बाबतीत कधीच समाधानी नसतात,हा त्यांचा खास स्वभाव असुन अधिवेशन संपायला अजून कालावधी असल्याने ये त्या काही दिवसात ते इंदापूर तालुक्यासाठी अजून मोठा नाही मंजूर करतील अशा चर्चा सध्या तालुक्यात रंगु लागल्या आहेत.