इंदापूर ता.3 : सणसर येथे काझड-बोरी रस्त्यानजिक आयोजित बैलगाडा शर्यतीस रविवारी (दि.3) उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या बैलगाडा शर्यतीस भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून शर्यती पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये सुमारे 659 हुन अधिक बैलगाड्या धावल्या. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, बैलगाडा शर्यती महाराष्ट्राचा पारंपरिक असा प्रसिद्ध सहसी व आक्रमक खेळ आहे. बैलगाडा शर्यतीला सुमारे 300 ते 400 वर्षाची जुनी परंपरा आहे. बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहते. बैलगाडा शर्यत व महाराष्ट्र, बैल व शेतकरी हे नाते पिढ्यान पिढ्यांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाल्याचे गौरवोद्गारही हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
गोकुळाष्टमीनिमित्त या भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे इंदापूर अर्बन बँकेचे संचालक तानाजी(बाबा) निंबाळकर, नितीन(आप्पा) काटकर, मधुकर वाघमोडे, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैभव देवडे आदींनी यशस्वी आयोजन केले. या सर्वांच्या यशस्वी नियोजनाचे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी कौतुक केले.
यावेळी वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते प्रत्येक बैलगाडा मालकास एक रोप भेट देण्यात आले. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
_________________________