अल्पावधीतच ‘चौफेर न्यूज ला’ वाचकांनी प्रतिसाद दिल्या नंतर आम्ही ‘चौफेर न्यूज’ मध्ये ‘गोष्ट जुनी – उजाळा नवा’ हे नवीन साप्ताहिक सदर सुरू करीत आहोत.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावचे सुपुत्र जेष्ठ पत्रकार, विनोदी व व्यासंगी लेखक तानाजी काळे हे या सदरात लेखन करणार आहेत.तानाजी काळे हे गेली 32 वर्षे राज्यस्तरीय प्रतिथयश दैनिकात इंदापूर तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता करीत आहेत.
गेल्या तीन दशकात त्यांनी अनेक विषयावर महत्त्वपूर्ण वार्तांकन केले आहे. शिवाय स्तंभलेखन ,विनोदी व वैचारिक लेखनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विविध पुस्तके, मासिकात व दैनिकात त्यांचे अवांतर लेखन प्रसिद्ध झाले आहे .
जुन्या व नव्या पिढीतील जाणकार व अभिरुची संपन्न असलेल्या आपल्यासारख्या वाचकांच्या पसंतीस हे नवे सदर नक्कीच उतरेल याची आम्हाला खात्री आहे.
*नवरदेवावरून ओवाळलेला नारळ..*
तानाजी काळे , पळसदेव
———————————————-
चाळीसेक वर्षांपूर्वी नवरदेव गावातून मिरवत वाजवत- गाजवत परण्या निघाल्यावर मारुतीच्या देवळामध्ये दर्शनासाठी येत असत.आजही तीच प्रथा आहे. पण त्यावेळची गंमत काही औरच.
मारूतीच्या पारावरच नवरदेवाचा लग्नातला पोशाख होई.नवरदेवाचा पोशाख पाहण्यासाठी तमाम मंडळी नवरदेवाला गोल वेढा मारून सापवाल्याचा खेळ पहावा तसा नवरदेवाचा पोशाख पाहत असायचे. याच वेळी नवरदेवाच्या मेहुण्यालाही (वरबापाचा जावाय ) मांडव परतणीचा पोशाख होत असे .परिस्थितीनुसार काही वेळा अंगठीही तिथेच दिली जायची. अंगठी नसेल तर काही जावाय पोशाखच मोडत नसत. तेव्हा मोबाईल नसतानाही लग्न मालकाचा जावाय अंगठीसाठी रूसल्याची बातमी हातोहात लग्न मंडपात जायची. मग, गावातील जेष्ठ मंडळी तात्यासाहेब , दादासाहेब, आण्णासाहेब , सरपंच , पाटील , वरबाप अशी मंडळी लगबगीने मारूतीच्या पारावर यायची. तोपर्यंत रूसलेल्या जावायाला तमाम मंडळीचा वेढा पढायचा. काही नातलग त्यांना समजावायचे , येत्या दिवाळीत अंगठी घालू…. पुढच्या लग्नात घालू …अशी समजूत घातली जायची . या राड्यात समीप आलेली लग्न घटीका टळून जायची.
जावाय लगेच ऐकत नसत . मग गावातील जेष्ठ मंडळी समजुतीच्या सुरात जावायाची समजूत काढत असे. तोपर्यंत परण्यासाठी आलेली तमाम मंडळी जावायाला पहाण्यासाठी त्याच्या भोवती गर्दी करायचे , प्रत्येक जण त्याला पाहून जायचे. काहीजण पुढं काय होतंय ते पाहायला तिथंच थांबायची. अनेकजण तर पहिल्यांदाच या जावायाला पहात असत. बघता -बघता सर्वांना कोण जावाय आहे. हे माहित व्हायचे.जावाय एका तासात सेलेब्रेटी व्हायचा.
तोपर्यंत नवरदेव ताटकळत एक- दोन कुलवर्याबरोबर थांबायचा. जेष्ठांनी खूप विनवणी केल्यावर कुठेतरी जावाय पोशाखाला तयार होत असे.तोपर्यंत आम्हा पोरासोरांना जाम भूक लागायची. आम्हा पोराचं सारं लक्ष नवरदेवावरून ओवाळून टाकलेल्या नारळाकडे असायचे . नवरदेव मारुतीच्या पाया पडून ,पारावरून मंदिराला वेढा मारून घोडा, किंवा बैलगाडी,मोटारसायकल तेव्हा जे वाहन असेल त्यामध्ये बसण्या अगोदर नवरदेवावरून एक नारळ ओवाळून तिथेच तो फोडला जाई.
एखाद्या जाणकाराने नवरदेवाला ओवाळून नारळ दगडावर आपटला की ,त्याचे तुकडे गोळा करण्यासाठी आम्हा पोरांची झुंबड उडायची. नारळ फोडणार्यावर बरंच काही अवलंबून असायचं. जोरात नारळ दगडावर आपटला तर, केवळ सहा-सात पोरांच्या हाती नारळाचे तुकडे लागायचे .किंबहुना एखादे वेळी दोनच तुकडे झाले तर, त्याचे दोघेच मालक होऊन ती मुलं लांब पळून जायची .बाकीच्यांचा हिरमोड व्हायचा .
कधी कधी नारळ फोडणारा सुद्धा भलताच चलाख निघायचा. तो नारळ फोडण्याची एक दिशा दाखवायचा …अन् नारळ भलत्याच दिशेला दगडावर फोडायचा.
त्यामुळे नारळावर टपून बसलेल्या पोरांचा चेहरा पाहाण्यासारखा व्हायचा . यावेळी नाही त्याच्या हातामध्ये नारळ पाडायचा. हा प्रकार मोठी माणसं आखो देखा हाल पाहत, हसत नवरदेवाच्या बरोबर जायचे. मग आमच्या आळीतल्या कुणापोराच्या हाती नारळाचा अर्धा भाग सापडला तर आम्ही तो वाटून खायचो. तोपर्यंत नवरदेव मांडवात जायचा .
नवरीचे मामा नवरीला घेऊन या ..
भटजींचा माईकवरून पुकार होताच , उपस्थितांच्या नजरा मामाकडे वळायच्या . मामाही अभिमानाने उठायचा . धोतराचा सोगा हातात धरून तरातरा जावून नवरीला आणायचा. तोपर्यंत सर्वांच्या नजरा मामाकडे वळायच्या.
या दरम्यानच्या काळात अंगठीसाठी रूसलेल्या जावायाची मंडपात तुफान चर्चा चालायची . ज्यांनी *रूसलेला* जावाय पाहिला नव्हता, त्यांना आवर्जून तो जावाय दाखविला जायचा. आया- बायांमध्येही रूसलेल्या जावायाचीच चर्चा. हिचाच नवरा रूसलाय म्हणून त्या मोठ्या कुरवलीकडेही आया- बाया मारक्या म्हशीवनी बघायच्या तेव्हा भर लग्नात तिचाही चेहरा पडायचा.एव्हाना मंगलाष्टिका सुरू व्हायच्या. शेवटची मंगलाष्टका कधी होतेय अन् कधी एकदाचं जेवाय बसतोय असं व्हायचं.
पण गर्दीतनं वाट काढीत अनेकजण मंगलाष्टके म्हणण्यासाठी भटजीच्या जवळ उभी राहायची. काही पट्टीचे मंगलाष्टके म्हणणारी मंडळी इतका सूर लांबवत ..लांबवत घसा ताणून मंगलाष्टके म्हणायची की, पोटात ओरडाणार्या कावळ्याच्या सूरात सूर मिसळायचा. कधी कधी नऊ, अकरा मंगलाष्टकापर्यंत आकडा जायचा.
एकदाचे… काकांनी आता…सावध वध सावधान समयो ,म्हणताच नवरदेव सावध होण्याआधीच आम्ही पोरं जेवाय बसाय सावध व्हायचो.
जेवणाच्या पंगती उभ्या बसतील का, आडव्या बसतील याचा अंदाज घेत असतानाच आपल्याला पहिल्या पंगतीलाच जागा कशी मिळेल, हे बघस्तोर एखादा आबा, आण्णा अशा उभ्या पंगती करून बसा म्हणताच, एकमेकाला हाताने रेटारेटी करीत पटा पटा पोरं बसून घ्यायची .
वाढपी पत्रावळीवर वाढायला सुरुवात करताच, आण्णा, तात्या, आबा वाढप्याना सक्त ताकीद द्यायचे. लहान पोरांना बघून वाढा अन्न वाया जाऊ देऊ नका . वाढप्यांवर नजर ठेवून ते पण पंगतीतून सतत येरझाऱ्या मारायचे.पोटभर जेवण करा पण, पत्रावळीवर शिल्लक ठेवू नका. हि त्यांची सक्त ताकीद रहायची.
एकदाची सर्व पंगतींना वाढ पोहचल्याची खात्री झाली कि, कुठून तरी सूर यायचा ..सदा सर्वदा योग तुझा घडावा …तुझे कारणी देह माझा पडावा .उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघू नायका मागणे हेचि आता…मग बोला पुंडलिक ….होताच सर्वजण जेवणावर तूटून पडायचे दोन – चार घास होताच…पुन्हा कुठूनतरी सूर यायचा….. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे…. मग पुन्हा एकदा बोला पुंडलिक…. हरी विठ्ठल होईपर्यंत आम्हा पोराचं जेवण उरकत असे… नदीकाठच्या मळईच्या वांग्याची भाजी, साळीचा हातसडीच्या तांदळाचा भात आणि कळीचे लाडू, वडाच्या पानाच्या पत्रावळीवरच्या जेवणाची चव न्यारीच होती.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..