बाप आणि आई माझी ,विठ्ठल रूकमाई !!
———————————————-
तानाजी काळे, पळसदेव
पिळदार छातीचा , नामांकित पैलवान बाप….
पैलवानकी व शेतातील काबाडकष्टाने वयाच्या ऐंशीत हाडाचा खिळखिळा करून अंथरुणावर खिळला.
शेतात जात होता,तोवर उतार वयातही बापाची न्याहारी विजेच्या चपळाईच्या वेगाने शेतात नेऊन देणारी माझी आई…. बापाने अंथरुण धरल्यावर जागच्या जागी थबकली. बापाच्या खाटंची पहारेकरी झाली. बापाच्या सेवेत बापाच्या खाटंचं उसं -पायथं तीनं अखेरपर्यंत सोडलं नाही .
तीचाही उभा जन्म काबाडकष्टातच गेला. उजनी धरणातून घरादाराचं, कोबंड्या – खुरवड्याचं पुनर्वसन, पोरांची शिक्षणं, पोराबाळांची लग्न, पोरींची बाळंतपणं , आलं -गेलं, शेतातलं राबणं , शिलाई मशीन काम, गुरंढोरं, कोबडं- कुत्रं….बघता- बघता तिच्याही हाडाची काडं कधी झाली ते तीलाही कळालं नाही.
काही कमीजास्त व ,लागेल ते आणून देण्यापलीकडे , दवाखान्यात अधूनमधून नेण्यापलीकडे बापाची सेवा माझ्या वाट्याला माझी आई, धर्मपत्नी, पोरसवदा वयाचा माझा मुलगा सागर यांनी येऊ दिली नाही.
तिघेही जमेल तसं सतत बापाजवळ असायची. अशा स्थितीत बघता बघता सात-आठ वर्षे सरली..
आबा अति वार्धक्यात गेले.
एके दिवशी सायंकाळी मला आबांनी हाक मारून घेतली. व म्हणाले…कुठं लांब जाऊ नको. या वाक्याने माझ्या ह्रदयाचा ठाव घेतला. मी तब्बेतीची विचारपूस करून आमच्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलावले. त्यांनी तपासून इंजेक्शन व काही औषधे दिली. व जाताना तेही म्हणाले ,कुठे जाऊ नकोस. आतामात्र मला ब्रम्हांड कोसळल्याचा भास झाला. त्या दिवशी पत्नीने दिलेली तांदळाची खीर केवळ अर्धी वाटी त्यांनी अशी- तशी घेतली.मी म्हशीची धार काढत होतो.मला त्यांनी पुन्हा खोलवर आवाजात हाक मारली . बापाच्या खोलवर गेलेल्या कातर आवाजातील हाकेने माझ्या बोटांना कापरं सुटलं.मी पुढे धार काढू शकलो नाही. म्हशीचं पारडं सोडले. आणि आबां जवळ आलो. अंगावर हात ठेवला.शरीर क्षीण झालं होतं.
मला म्हणाले, जेवण करून घे.
कसे- बसे मी चार घास पोटात ढकलले. बापाच्या खाटेवर आलो . हातावर भार ठेवून ते बसले होते. मी त्यांची मान, पाठीला हलक्या हाताने मालीश करीत होतो. अधूनमधून मी बापाचे तेल लावून मालीश करीत असे. लहानपणी मी आबांच्या पुढे झोपत असे. आबांनी माझ्या डोक्याची मालीश केल्याशिवाय मला झोप येत नसे.माझ्या मनात अनेक आठवणींचे काहूर माजले होते.मालीश करताना
अधून मधून आम्ही एखादा दूसरा बोलत होतो.वडील ही हं ..हं..करीत प्रतिसाद देत होते. एव्हाना रात्रीचे दहा वाजत आले होते. वडीलांचा चेहरा पुढे होता.माझा पाठीवर हात फिरत होता. आईचे लक्ष आमच्याकडे होते.
एकाएकी वडीलांचे शरीर पाठीमागे झुकले.
मी अलगद त्यांचे डोकं माझ्या मांडीवर घेऊन त्यांना झोप लागली समजून, अलगद मांडी बाजुला घेत डोक्याखाली ऊशी सरकवून त्यांच्या अंगावर पांघरून घातले. आणि आईला सांगून मी झोपण्यासाठी गेलो. परंतू मला झोप येईना. मी उठून पुन्हा वडीलांकडे आलो. आई, जागीच होती. व्यवस्थित झोपलेत का, खात्री करावी म्हणून तोंडावरील पांघरून बाजुला काढले. वडिलांना गाढ झोप लागलेली दिसत होती. पण श्वास जाणवत नव्हता. मी पत्नीला हाक मारली .पत्नी घाई गडबडीने आली . आईही जागीच होती. तीने नीट निरखून पाहिलं. म्हणाली आबा गेले…..
आई….गं…करीत, माझ्या अश्रूंचा बांध फुटला. रात्रीच्या निरव शांततेत अनामिक आर्त मिसळली…. पोरगं त्या आवाजाने उठलं. माझी परिस्थिती त्यानं पाहिली. पावलोपावली लाड करणारा आजोबा ….निपचित पडलेला. भाव- भावकी गोळा होईपर्यंत तोच जणू माझा बाप होऊन माझेच सांत्वन करीत आज्जीला, आईला धीर देत होता.
सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. आणि पोराने आजोबांच्या देहाच्या गळा पडून फोडलेल्या हंबरड्याने नातू – आजोबांच्या नात्याची वीण… उपस्थितीत नातलगांच्या अश्रूंनी
पुन्हा भिजली.
आईच्या दुःखाला आता सीमा नव्हती.
दिवस जात होते.नव्हे, भरल्या घरात आई दिवस कंठीत होती.
बघता बघता वर्षे सरत आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज व देहू संस्थानचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब मोरे महाराजांच्या किर्तनाने वडिलांचा अखेरचा दिवस (प्रथम वर्ष पुण्यस्मरण) पार पडला.
आई सतत उदास दिसायची. मला आईचा केविलवाणा चेहरा पाहवत नसायचा. ती कुठे इकडे तिकडे कोपर्यात बसू नये.म्हणून मी तीचा नसलेला पसारा दर्शनी रूममध्ये ( हाॅल) ठेवला होता.
जेणेकरून ती सतत समोर दिसावी .
ती कधी नातूत रमली तरी , अधूनमधून तीची नजर शुन्यात जायची.
एके दिवशी मी आईजवळ आई…आई…करीत बराच वेळ बसलो. आई म्हणाली, कारं, बाबा…..
मी म्हणालो, आई…. बाप तर गेला… आता तू असं, सतत दुःख करीत बसून गेली तर आम्ही काय करायचं ??
आईने पुन्हा अश्रूंना वाट करून दिली. आणि हळूहळू ती सावरू लागली . पुढे नातू शिक्षणासाठी पुण्याला गेला. रोज सायंकाळी त्याचा फोन आल्यानंतरच ती झोपायची . तीचा तो दिनक्रमच झाला होता.
दिवस जात होते. आई आता अंथरुणावर खिळली होती . नव्वदच्या वयातही तीचे सोपस्कार ती करीत होती.परंतू बाथरुम पर्यंत तीला हाताला धरून न्यावे लागायचं. उभे आयुष्य कोणाचीही मदत न घेता कष्ट करून जगलेल्या कणखर आईला कोणाचा आधार घ्यायला संकोच वाटायचा.माझ्या पत्नीच्या आधारानं मात्र ती जायची , कधी -मधी माझ्यावर ही वेळ यायची. तीची नखे काढणे, कधी केस विंचारून देताना,तीची मी आई होणं मला आत्मीक सुख देऊन जायचं. कधी पत्नी शेतात , माहेरी गेली की , मी कायम आईभोवती जणू पिंगा घालत दिवसभर बसायचो.
आता आईचे वय ही पंच्याण्णवच्या पुढे झुकले होते.काळ थांबला नाही. आईला त्याने अति वार्धक्याच्या खाईत लोटलेच.
ती अंथरुणाला खिळली ती कायमचीच.
काबाडकष्टाने झिजलेल्या शरीरावर काळाने त्याचे काम करून परावलंबी केले.
उठणं -बसणं सुद्धा अशक्य झालं.
सगळे सोपस्कारही कपड्यातच.
वृद्धत्व सोडून दुसरा कोणताही आजार नव्हता. नव्वदी पार तर ती स्वावलंबी होतीच.
पण आता काळ… हळूहळू सर्वच शरीरावर
त्याचे अधिराज्य गाजवत पुढे सरकत होता.
….मग आम्ही उभयतांनी ठरविले ,तीची
आई व्हायचं…..
लहानपण आठवलं.. खाता – पिताना मी जसा करायचो. तसंच तीही ………….
तीचं परावलंबित्व वाढत गेलं. आवाज क्षीण होत गेला. खोलवर गेलेले डोळेच तेवढे बोलत होते.
मी व्यवसायाने शेतकरी, पेशाने पत्रकार
गाई-म्हशीच्या मलमुत्राशी जुनीच दोस्ती. पत्रकारितेच्या दुनियेची सफर करताना, विविध रोगांच्या साथीत अनेक रूग्णालये धुंडाळलेली. गोमातेचं आपण विनासंकोच करतो.हि तर माझी माता होती. पत्नीच्या गैरहजरीत आईचे खराब झालेले अंथरूण, पांघरून धूताना
संकोच सोडणं सोपं गेलं.
शेतीतले काम, महत्वाच्या बातम्या कव्हर करताना माझी जरा धावपळ व्हायची परंतु थकलो कधीच नाही.
धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. अधूनमधून मला ती हाक मारायची . लहानपणी घराबाहेर सवंगड्याबरोबर खेळायला,पोहायला गेल्यावर हाका मारायची तशीच हाक…परंतू खोलवर गेलेला आवाज. तिच्या आर्त हाकेमुळे माझ्या अंतर्मनात पान्हा फुटत असावा. रोजच्या रहाटगाडयात
कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो.
कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं!
पण फार काळ नाही.
पुन्हा तीच घालमेल, त्या दिवशी आईला मला हाक मारता आली नाही. परंतू किंचितसा हात वर करून मला तू मला कुठे जाऊ नको म्हणून खुणावले. बरेच नातलगही जमले होते. काही गावकरी बसून होते.
मी उठलो आईचे डोकं मांडीवर घेतलं. दोन चमचे नारळपाणी पाजले. त्या पाण्यात माझ्या अश्रूंचे दोन थेंब कधी पडले हे पाणावलेल्या डोळ्यांना ही दिसले नाही.
काही वर्षांची सेवा ,मातृदेवतेच्या चरणी विलीन झाली. आणि तिसर्या प्रहरी आईने आम्हा उभयतांचे मातृत्व स्विकारत माझ्या मांडीवर प्राण सोडून इहलोकाची यात्रा संपवली.
मला, माझ्या धर्मपत्नीला आईच्या सेवेची संधी मिळाली .
गावकरी, सगेसोयरे म्हणाले, पुण्य कमावलंस.
त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला आई चित्रगुप्ताकडे गेल्याशिवाय राहायची नाही.
परमेश्वर आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू.
परमेश्वर खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वी वर पाठवलं असावं , विधात्याने…
..धनाजीची असो की तानाजीची.
कौशल्या असो की अंजना.
आई सगळ्यांची सारखीच.
तन मन धनाने आपली शक्ती .
लेकराच्या भल्यासाठीच तिचं ह्रदय देणारी. प्रत्येकाच्या मनातली अढळ देवता.तिच्या पोटातला आपला अंकूर तिचंच रक्त शोषून तगणारं जणू बांडगुळ. पोटात नीट राहिल तर नवलच.. तिचीच उर्जा घेऊन पोटात पाय पसरू लागले की झाली लाथा मारायला सुरुवात.
तीळातीळानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका.
कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला लवचिक न करणारा. पोटात
लाथा मारणारं बाळ, त्याला धक्का लागू नये म्हणून तीची होणारी तारंवरची कसरत नव्हे, पोटात चाललेली सर्कसच.
नऊ महिने नऊ दिवसांची कठीण कसरत.
राम जन्माला आला…आज्जीचं कौतुक, आजोबा… तर, राज्याभिषेकाच्या तयारीत. बापाच्या हातात कोल्हापुरातील तालमींची यादी.
पोटातून बाहेर आला की मालकी दुसऱ्यांचीच.
पण अखेरची वेळ आली की सगळ्यांची तोंडं दाही दिशा.
उताना, पालथा , या अंगावरून त्या अंगावर, बसायला यायच्या आदी उसळ्यावर उसळ्या ..उभा रहायच्या आधीच जणू चंद्रावर झेप…. पहिल्या पावलात आधाराच्या काठीचं उरी स्वप्न बाळगून काबाडकष्टाने केलेलं धुणं -धाण , सडा -सारवण,उष्टी काढा.
सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे पावलोपावली घटीका भरल्याची नांदीच.
माता कुराणातील असो वा पुराणातील. तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं.
अनुसूया असो कि कैकयी
रावाची असो किंवा रंकाची
*आई शेवटी आईच असते!*
जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं -त्याचं नातं परावलीचं. तिनं, विना अपेक्षेने उधळलेली अनमोल ममता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या मायेशी गुणला की शुन्यच.
तरी या ममत्वाच्या परतफेडीसाठी अमिराचाही
खजिना अपूराच.
शेअर्स सर्टिफिकेटस, फिक्स डिपाॅझीट,नोटा हि केवळ कागदच.
आईचं कर्ज फेडण्या इतके मुल्य त्यात कुठे आहे??
या ऋणातून मुक्त होण्याचा एकच छोटासा प्रयत्न …
एक उतराई… उतराई तर कधीच होऊ शकणार नाही.
संत साहित्याचा दाखला देत, किर्तनकार हेच सांगतात. तीर्थक्षेत्र घरीच आहे. पहा एकदा ध्यान लावून बापाकडे…. साक्षात विठ्ठलच दिसेल..बापातला विठ्ठल दिसला की आईत लपलेली रूकमाई दिसल्या शिवाय रहात नाही.
संत साहित्याचा दाखला देत किर्तनकारांनी सांगितलेला हा दृष्टांत मी अनुभवलाय.
आज माझ्या जवळ आहेत फक्त त्यांच्या आठवणी. आणि आशीर्वादाचं पाठबळ हा ऐवज मला आयुष्यभर पुरेल.यात शंका नाहीं.
वाटतच असेल तर आईच्या वृध्दापकाळात जरूर व्हा.
आईची आई. नाही होता आलं..निदान मावशी तरी !
– तानाजी काळे, पत्रकार
पळसदेव ता.इंदापूर
9423534515
*************************************