बावडा ता. 9 : इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी व त्यावरील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अशातच सध्या निरा नदीवर असणाऱ्या जवळपास सर्वच धरणांमध्ये जवळपास 90 टक्के पाणीसाठा झाला आहे त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
प्रतिवर्षी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस हा 15 ऑगस्ट पर्यंत कमी होत असतो त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर नीरा नदीवरील असणारे सर्व बंधारे धापे टाकून पाण्याने पूर्ण भरून घेतले जातात. मात्र यावर्षी अद्याप नीरा नदीत पाणी सोडले गेले नसल्याने नीरा नदी व त्यावरील बंधारे सध्या कोरडे आहेत. तर बंधाऱ्या जवळच्या भागात अल्प प्रमाणात खोरोची पासून ते नरसिंहपूर पर्यंत पर्यंत पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.. त्यामुळे नीरा नदी परिसरातील इंदापूर तालुक्यातील गावच्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम काही प्रमाणात होत आहे.
अशातच धरण परिसरातील पाऊस साधारणपणे ऑगस्ट महिन्यात उघडतो. त्यामुळे प्रतिवर्षी जून पासूनच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरा नदीत पाणी सोडले जाते. व बंधारे भरण्यासाठी बंधाऱ्यांचे ढापे अर्थात गेटही 15 ऑगस्टनंतर लगेचच टाकून पाणी बंधाऱ्यात अडविले जाते.
त्यामुळे प्रतिवर्षी नदी व त्यावरील बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरलेले असायचे.
परंतु या पावसाळ्यात निरा नदीत प्रतिवर्षीप्रमाणे पाणी न सोडल्याने सध्या निरा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. व ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडल्याचे कारण पुढे करून जलसंपदा विभागाने पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांना आपली पिके यापुढील काळात कशी टिकवायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. .
त्यामुळे जलसंपदा विभागाने नीरा नदीत तत्काळ पाणी सोडावे. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याचबरोबर आपली शेती वाचवण्यासाठीी शेतकऱ्यांनी राजकीय मतभेद विसरून नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.