शेटफळगढे ता. 13 : शासनाने शेतकऱ्याची चांगली जमीन पोंधवडी पाझर तलावासाठी संपादित केली. त्या बदल्यात शासनानेच दिलेली जमीन वन विभागाने काढून घेतली. अखेरीस जवळपास दोन वर्ष शासन दरबारी पाठपुरावा करूनही जमीन ताब्यात मिळाली नाही अखेरीस पिंपळे येथील शेतकरी सुनील साहेबराव बागल यांनी आपल्या कुटुंबासह इंदापूर येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनाकडून खरोखरच अन्याय झालेल्या या शेतकऱ्याच्या मदतीला तालुक्यातील आजी-माजी नेते धावणार का ? याची उत्सुकता संपूर्ण इंदापूर तालुक्याला लागली आहे
मौजे पिंपळे येथील शेतकरी साहेबराव हरिबा बागल यांची वडिलार्जित जमीन पोंधवडी येथील गट नंबर 229 हि भोगवटा वर्ग एक ची जमीन शासनाने पोंधवडी व पिंपळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून संपादित केलेली होती व सदर ठिकाणी पोंधवडी तलाव आजही अस्तित्वात आहे .
असे असताना पुढे सदर शेतकरी साहेबराव बागल यांना सन 1971 साली पिंपळे येथील जमीन शासनाची अनर्जित रक्कम उप कोषागारात भरून घेऊन सदरची जमीन शेतकऱ्याला कायमस्वरूपी लागवडीसाठी दिलेली होती सातबारा पत्रके फेरफार नंबर 222 ने साहेबराव हरिबा बागल यांच्या नावाची नोंद 5 हेक्टर 87 आर इतक्या मिळकतीला शेतकऱ्याच्या ताब्यात शासनाच्या आदेशाने सन 1971 पासून सदरची जमीन होती.
मात्र 17 जून 2020 रोजी वनविभागाने एक नोटीसही न देता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनचे साह्याने सुनील बागल या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चार एकर मोठे डाळिंबाचे पीक .तीन एकर उभा ऊस व इतर पिके असताना शेतकऱ्यांचे घर जनावरांचा गोठा व हॉटेल यांची पूर्णतः तोडफोड केली त्यामुळे जवळपास 25 ते 30 लाख रुपयाचे नुकसान केले.. व सदरची जमीन बेकायदेशीरपणे वनविभागाने ताब्यात घेतली.
याबाबत बागल यांनी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सर्व कार्यालयात लेखी तक्रारी दिलेल्या होत्या. तसेच त्याच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. महसूल मंत्री वनमंत्री व इतर संबंधित सर्व खात्यांना वेळोवेळी पाठवलेल्या होत्या. प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनही पाठपुरावा केला. परंतु आज पर्यंत सदर शेतकऱ्यांची कोणीही दखल घेतलेली नाही . त्यामुळे बागल यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी कुटुंबीयांसमवेत आत्मदहनाचा इशारा दिला..
सध्या तालुक्यातील दोन्ही आजी माजी नेते हे सत्तेत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शासनाने अन्याय केलेल्या या शेतकऱ्याच्या मदतीला तालुक्यातील हे दोन्ही नेते धावणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.