शेटफळगढे ,ता, 13 ग्रामपंचायती इंटरनेटला जोडण्यासाठी महा नेटचे जाळे गावोगावच्या रस्त्याच्या कामात उध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात होते. मात्र २०१८ मध्ये या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. बहुतांशी ठिकाणी या रस्त्यालगतच खोदाई करून केबल टाकली होती मात्र इंटरनेट डाटा अद्याप मिळालाच नाही. आता मात्र अनेक रस्त्यांची कामे चालू असल्याने सध्या या केबलच उकरून रस्त्याच्या कडेला पडल्या आहेत. हा प्रकार इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे ते भावानीनगर रस्त्यादरम्यान झाला आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस मध्ये केबल नेऊन एक बॉक्स बसवण्याचा प्रकार केला आहे मात्र त्यामधून डाटा दिला गेलाच नाही.ग्रामपंचायतींना इंटरनेट एकमेकांना जोडण्यात येणार होते त्यामुळे ‘जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत’ अशी थेट माहितीची देवाण-घेवाण करणे शक्य होणार होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधाही राबवणे तसेच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवण्याबाबत केंद्र सरकारने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या, ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच एकात्मिक बालक विकास प्रकल्पांना अत्याधुनिक संगणक प्रणाली उपलब्ध करून इंटरनेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुविधेने जोडण्याचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव होता. ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना दाखले व इतर कामासाठी ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत बैठकांसाठी जिल्हा परिषदेत यावे लागते. त्यामुळे तालुकास्तरावर अनेक कामे प्रलंबित राहतात. त्याचा फटका नागरिकांना बसतो. या सेवेमुळे नागरिकांना फायदा होईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आळा बसण्यास मदत होणार होती. २०१८ साली पहिल्या टप्प्यात ८५४ ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या सुविधेने जोडण्यासाठी. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत इंटरनेट जोडणीकरिता निधी मिळाला होता. त्या निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील ८५४ गावांमध्ये ब्रॉंडबॅन्ड कनेक्शन जोडणीचे आदेश दिले होते. या ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या नसल्याने ‘आपले सरकार’ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधाही नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे.