भवानीनगर ता. 4 : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे ॲक्शन मोड वरती आले आहेत. त्यांनी ब वर्ग मतदारसंघातील विरोधी पॅनलच्या उमेदवाराचा पाठिंबा जय भवानी माता पॅनलच्या उमेदवाराला मिळवून घेत विजयाची पायाभरणीच केली आहे. त्यामुळे श्री भरणे यांच्या पहिल्याच यशस्वी डावपेचांचाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार क्रीडामंत्री दत्तात्रय मामा भरणे ज्येष्ठ नेते श्री पृथ्वीराज बापू जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी माता पॅनल उभा आहे.
निवडणुकीमध्ये ब गटातील विरोधी पॅनल मधील उमेदवार सत्यजित भाऊसाहेब सपकळ यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता अर्ज माघारी घेण्याचे दिवशी तो अर्जही कायम ठेवला होता.
मात्र दत्तात्रय भरणे हे राज्याचा दौरा करून तीन मे रोजी भरणेवाडी येथील निवासस्थानी आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी यशस्वी डावपेच टाकत सत्यजित सपकाळ यांचा जय भवानी माता पॅनल मधील अधिकृत उमेदवार अशोक पाटील यांना जाहीर पाठिंबा मिळवून घेण्यात यश मिळवले.
त्यामुळे अशोक पाटील यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून या विजयाची मुहूर्तमेड श्री भरणे यांनी केल्यामुळे जय भवानी माता पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र पाठिंबा देण्यासंदर्भातील चर्चेदरम्यान सपकळ पिता पुत्र यांना श्री भरणे यांनी काय आश्वासन दिले हे मात्र गुलदस्त्यातच आहे.