भवानीनगर ता. 22 : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली होती. या प्रारूप यादीवर 20 जुलै पर्यंत हरकती दाखल करावयाच्या होत्या. या मुदतीत सभासदांनी 595 हरकती दाखल केल्या आहेत.
हरकतींची संख्या जास्त असल्याने हरकतीच्या सुनावणीस देखील सुरू झाली आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सव्वातीन वर्षापासून रखडली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या आदेशानुसार 29 हजार 517 सभासदांचा समावेश असलेली मतदार यादी 12 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत मयत झालेले मतदार व थकबाकीदार मतदार यांचाही समावेश आहे. तसेच सलग तीन ते पाच वर्ष कारखान्याचे सभासद असूनही कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा न करणाऱ्या अक्रियाशील सभासदांचाही समावेश आहे. या यादीवर हरकती दाखल करण्यासाठी 20 जुलै पर्यंत दिलेल्या मुदतीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 595 सभासदांनी प्रारूप यादीवर हरकती दाखल केल्या आहेत. हरकतींची संख्या ही जास्त असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ सुनावणीला सुरुवात करण्यात केली आहे.
येत्या 28 जुलै पर्यंत हरकतीची सुनावली पूर्ण होणार आहे. व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने निर्णय दिला जाणार आहे. त्यातून समाधान न झाल्यास दोन्ही बाजूचे सभासद पुन्हा न्यायालयात जाणार का ? हा देखील उत्सुकतेचा विषय होणार आहे. तर 2 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रक्रियेला गती येणार आहे.
मात्र विद्यमान संचालक मंडळाला जवळपास सव्वातीन वर्षाचा मिळालेला मुदतवाढीच्या बोनस आणखी वाढणार का ? तत्काळ दोन ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक लागून संपुष्टात येणार ? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.
मात्र जवळपास सव्वातीन वर्ष निवडणुकीविना मिळालेला मुदत वाढीचा हा बोनस संचालक मंडळाच्या आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे.