इंदापूर ता. ९ : सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी किमान एक लाख रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना आकार मानानुसार किमान १५ हजार ७१७ रुपये ते कमाल ७५ हजार अनुदान देण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. परंतु डिझेलच्या दरवाढीमुळे पोकलेन व जेसीपी चालकांनी आपल्या प्रति तासाच्या दरात वाढ केली आहे. याशिवाय शेततळे खोदताना शेतकऱ्यांना कडक पाषाण लागल्यास ब्रेकरही लावावा लागत आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे ७५ हजार रुपयांचे अनुदान कमी पडत आहे. यापूर्वी 2014 पर्यंत आकारमानानुसार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी किमान ३५ हजार ते कमाल एक लाख रुपया पर्यंत अनुदान दिले जात होते.२०१४ मध्ये युती सरकार आल्यानंतर शेतकरी लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी हे अनुदान कमी करून कमाल पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून अनुदान वाढवण्याची मागणी होत होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारने या अनुदानात वाढ करून कमाल ७५ हजार रुपये शेततळे खोदण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तरी देखील वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे अनुदान अपुरे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन अस्तित्वात आलेल्या सरकारने किमान शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे . अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अशातच पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा या निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शासन स्तरावर शेततळे खोदण्यासाठी अनुदानात वाढ करण्याबाबतचा विचार होण्याची शक्यता आहे
———————————
चौकट प्रतिक्रिया
पाणी टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेततळ्याचा शेती सिंचनासाठी उपयोग होत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात शेततळे असावे असे वाटते. परंतु अपुऱ्या अनुदानामुळे व आर्थिक अडचणीमुळे अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना शेततळे खोदता येत नाही. त्यामुळे सरकारने कमाल एक लाख रुपयाचे अनुदान शेततळे खोदण्यासाठी देणे गरजेचे आहे.
– रोहित हेळकर, शेतकरी निरगुडे
—————————————-