इंदापूर ता. 10 : इंदापुरात 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासारख्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाहीत. . त्यामुळे इंदापूरच्या जनतेचा कौल कोणाला ? या प्रश्नाचे उत्तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीतच मिळणार आहे.यापूर्वी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत होत्या त्यामुळे तालुक्यातील जनतेचा कौल कोणाला हे समजत होते. व त्यातून कोणत्या पक्षाला किती मते मिळाली. हे देखील समजत होते.परंतु 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोणतीच सार्वत्रिक स्वरूपाची निवडणूक झाली नाही.
केवळ बाजार समिती समितीची निवडणूक पार पडली. पण या निवडणुकीत फक्त विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी या प्रवर्गातील मोजकी जवळपास 4 हजाराच्या आसपास मते होती. तालुक्याच्या सध्या असलेल्या 3 लाख 16 हजार मतदार संख्येच्या तुलनेत ही संख्या अगदी एक टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे यावरून तालुक्याचा कौल समजत नाही.विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. परंतु या निवडणुका या गावकी भाऊकी नातेसंबंध यावर व गावच्या स्थानिक प्रश्नावर एकमेकाच्या हेवेदाव्यांवरती लढल्या जातात याशिवाय सरपंच ज्या पक्षाचा असतो त्या पक्षाकडे ती ग्रामपंचायत आहे असे समजले जाते परंतु एकटा सरपंचावरून त्या गावचे सार्वत्रिक मतदान समजत नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊनही तालुक्याचा सार्वत्रिक कौल समजला नाही.
याशिवाय नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संदर्भात न्यायालयात गट व गण रचना व प्रभाग रचनेवरून हरकती दाखल आहेत. त्याच्या सुनावण्या सुरू आहेत. त्यामुळे यादेखील निवडणुका झाल्या नसल्याने तालुक्याचा सार्वत्रिक जनतेचा कौल कोणाला ? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही.परंतु विधानसभा निवडणुकीला आता केवळ दहा महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बंधनीलाही सुरुवात केली आहे. आजी माजी लोकप्रतिनिधी तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच आहेत. परंतु त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालकही आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
त्यामुळे या चौघापैकी कोणी माघार घेतली तर इंदापूरच्या विधानसभेची आगामी लढत दुरंगी तिरंगी की चौरंगी होणार व जनता कोणाला कौल देणार ? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी जनतेला आणखी दहा महिने वाट पाहावी लागणार आहे.परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 3 हजार 110 मतांनी विजय झाला होता त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील तालुक्याच्या मतदानाचा कौल हा 5 हजार मताच्या आतून असेल. हे मात्र निश्चित !