इंदापूर ता. 7 : इंदापूरचे लोकप्रतिनिधी व राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील गोरगरिबांच्या पक्क्या घराचे स्वप्न पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत साकार केले आहे. या अंतर्गत इंदापूर तालुक्यात 4 हजार 382 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पक्क्या घराचे स्वप्न पाहत असलेल्या गोरगरिबां मध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
पुणे जिल्ह्याला यावर्षी ३८ हजार ८२७ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 32 हजार 118 विक्रमी घरकुलांना मंजुरी दिली आहे यात इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 4 हजार 382 घरकुलांचा समावेश आहे.
या वर्षात पहिल्या टप्प्यात 1 हजार 88 घरकुल मंजूर आहेत त्यापैकी 741 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केलेला आहे. तसेच पहिला व दुसरा टप्पा मिळून इंदापूर तालुक्यात 5 हजार 275 घरकुलांना आज अखेर मंजूरी मिळालेली आहे.
तसेच इंदापूर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत प्रामुख्याने आधार कार्ड दिलेले नाही अशा नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्या प्रस्ताव सादर केलेल्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला संलग्न करावीत. स्वतःची जागा उपलब्ध असल्याची कागदपत्रे ग्रामपंचायत किवा पंचायत समितीमध्ये द्यावीत. त्यानंतर तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांच्या घरकुलांना तात्काळ मंजुरी दिली जाणार आहे.