शेटफळगढे ता.25 : इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनाला खडकवासला कालवा वरदान ठरलेला आहे. परंतु गेल्या 20 वर्षापासून याच मुख्य कालव्याची दुरुस्ती झाली नसल्याने आवर्तनाच्या काळात या कालव्यातून पाणी पुढे जात नाही. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेती सिंचनासाठी गरज असणाऱ्या उन्हाळ्याच्या काळात सिंचनावरती सर्वाधिक परिणाम होत आहे.
तसेच पुणे शहराला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने शेती सिंचनाची रब्बी व उन्हाळ्यातील आवर्तने ही कमी होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सिंचनाखालील क्षेत्र कमी होत चालले आहे.
त्यामुळे आवर्तनाच्या काळात मिळणाऱ्या पाण्यातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी यासाठी मुख्य कालवा व वितरिका यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे . त्यामुळे इंदापूर तालुक्यातील मुख्य कालव्याच्या वितरिकांच्या दुरुस्ती साठी सरकारने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
शेटफळगढे गावच्या हद्दीपासून खडकवासला उपविभाग इंदापूर यांची हद्द सुरू होते. परंतु दौंड चा उपविभाग असताना व त्यानंतर स्वतंत्र इंदापूरचा उपविभाग होऊ नये खडकवासला मुख्य कालव्याच्या दुरुस्तीला सरकारकडून मागील जवळपास ३२ वर्षाच्या काळात निधी मिळाला नाही. त्यामुळे या मुख्य कालव्यात मुख्य कालव्यात अनेक ठिकाणी दगडी बांधकामे व झाडेझुडपे पडलेली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात गाळ व गवत झाला आहे अशीच मुख्य कालव्याची परिस्थिती जवळपास खडकवासला प्रकल्पाच्या इंदापूर उपविभागाच्या अंकित असणाऱ्या ४२ किलोमीटर अंतरात आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा आवर्तन सुरू असतानाच्या काळात कालव्याच्या प्रवाहातून पाणी पुढे सरकत नसल्याने कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी अत्यंत कमी दाबाने मिळत आहे सिंचित भागापर्यंत पाणी अत्यंत कमी दाबाने मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याने त्यांची शेती सिंचित करण्यात अडचणी येत आहेत.
याशिवाय वित्रीकांना पाणी सोडण्यासाठी सध्या वापरात असलेल्या हेड रेग्युलेटरही नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने गरज असणाऱ्या उन्हाळ्याच्या काळात मुख्य कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याची गती मंदावत असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
इंदापूर तालुक्या तालुक्याच्या शेती सिंचनासाठी खडकवासला प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर सुरुवातीला या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात जवळपास १६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत होते परंतु मुख्य कालव्यातून पाणी पुढे जात नसल्याने व सिंचनाला पाणी कमी दाबाने उपलब्ध होत असल्याने सध्या केवळ दोन हजार हेक्टर क्षेत्र तालुक्यात या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सध्या ओलिताखाली येत आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत व वरसगाव या धरणांची निर्मिती मुळात इंदापूर दौंड हवेली बारामती या तालुक्यातील शेती सिंचनासाठी करण्यात आलेली आहे. परंतु याही देखील धरणाचा पाणीसाठा पुणे शहराच्या पिण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे यापूर्वी जवळपास सहा ते सात आवर्तने येत होती.
मात्र अलीकडील पाच वर्षात ही संख्या तीन ते चार आवर्तनांवर आलेली आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या क्षेत्रातही घट होत आहे. त्यामुळे उपलब्ध होण्यात होणाऱ्या पाण्यातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी यासाठी सरकारने खडकवासला प्रकल्पाच्या इंदापूर तालुक्यातील कालवे व दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
———————————