इंदापूर : ता.5 : नीरा डावा कालव्याचे चालू असलेले आवर्तन 20 सप्टेंबर पर्यंत संपवून, दि.21 सप्टेंबर पासून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नीरा डावा कालव्यातून तलावामध्ये 15 ऑक्टोबर पर्यंत पाणी सोडून तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घेण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सोमवारी (दि.4) दिली..
बावडा येथील प्राचीन काळातील काळेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच ग्रामस्थांनी बावडा गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे आभार व्यक्त करीत सन्मान केला.
सदर प्रसंगी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.ते म्हणाले, पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी झाली. त्या बैठकीमध्ये शेटफळ तलावात पाणी सोडता नाही अशी अधिकाऱ्यांची टिप्पणी होती. त्यामुळे जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शेटफळ तलावामध्ये नीरा डावा कालव्याचे चालू असलेल्या आवर्तन पुर्ण झाले नंतर तात्काळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शेटफळ तालवाची क्षमता 640 एम सेफ्टी असून, तलावाला नवीन व्हॉल टाकला जाणार आहे. शेटफळ तलाव भरून घेण्यात येणार असल्यामुळे बावडा व परिसरातील 10 गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
शेटफळ तलावातून अनेक परवान्या बेकायदेशीरपणे देण्यात आल्या आहेत, त्यातील फक्त चार परवानग्या कायदेशीर आहेत. त्यामुळे बेकायदेशीर असलेल्या पाणी परवानग्या रद्द करणे बाबत आमचा लढा सुरू राहील, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
भीमा नदी पात्रात सुमारे 1 टीएमसी एवढे पाणी पंढरपूर व इतर नळ पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्याचा निर्णय दोन दिवसात होणार आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची मुंबईत एक-दोन दिवसात बैठक होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. भीमा नदी पात्रात पाणी सोडणे संदर्भात सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी माझी बोलणे झाले असून आंम्ही सतत संपर्कात आहोत.
बावडा गावच्या वाडीवस्त्यांसाठी सुमारे रु.15 कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फीडर द्वारे 24 तास वीज, 6 ठिकाणी पाण्याच्या टाक्या आदी नियोजन करण्यात आले आहे. तसेच खंडोबानगर येथील तलावाचे खोलीकरण करून सुमारे 150 कोटी लिटरचा क्षमतेच्या साठवण तलावाचा प्रस्तावही तयार केला जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
निरा भिमा कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ आता संपला आहे, शेतकऱ्यांनी कारखान्यावर अडचणीच्या काळात विश्वास दाखवल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले तसेच ऊस बिल देण्यास विलंब लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
बावडा, पिंपरी बु.,आदी बावडा भागातील विविध वीज उपकेंद्राच्या ठिकाणी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेमाध्यमातून नवीन एमव्ही ट्रांसफार्मर बसवण्यासाठी नियोजन केले जात आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या 9 वर्षात वीज उपकेंद्रांमध्ये क्षमता वाढविण्यासाठी नवीन काहीही काम झालेले नाही, त्यामुळे शेतकरी वर्गाचा विजे संदर्भात त्रास वाढल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी बावडा व गणेशवाडी ग्रामस्थ, शेतकरी संघर्ष समिती तसेच सुरवड ग्रामस्थांनी हर्षवर्धन पाटील यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी केले. यावेळी मनोज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार संतोष सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास बावडा पंचक्रोशीतील कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________