इंदापूर ता. 3 : इंदापूर तालुक्यात 24 ते 26 मे 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होऊन घरामध्ये पाणी शिरलेल्या व नुकसान झालेल्या 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान व तसेच जवळपास 57 टन धान्य वाटप करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचीही कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तालुक्यामध्ये नदी, नाले, ओढे यांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन ५१ गावामध्ये जवळपास २ हजार ९०० घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच काही ठिकाणी कालवा, तलावावरील बांध फुटून जमीन व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
त्या अनुषंगाने . उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री यांनी इंदापूर तालुक्याचा तातडीने पाहणी दौरा करुन सर्व नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करणेबाबत आदेश दिले होते.
या आदेशानुसार इंदापूर तालुक्यातील ५१ गावातील नुकसानीबाबत तातडीने युद्धपातळीवर पंचनामे करण्यात आलेले आहेत व त्यानुसार तालुक्यातील बाधित कुटुंबाना तातडीने मदत मिळणेसाठी अनुदान मागणी करणेत आलेली होती.
याचा दत्तात्रय भरणे यांनी शासन स्तरावर पाठ पुरावा करुन तातडीने अनुदान मिळणेबाबतची कार्यवाही अंमलात आणली. व तालुक्यासाठी अनुदान उपलब्ध केले आहे .
त्यानुसार ज्या घरात पावसामुळे पाणी शिरुन नुकसान झालेले आहे अशा कुटुंबासाठी प्रति कुटुंब रक्कम रुपये १० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश 30 मे 2025 रोजी प्राप्त झाले आहेत.
यानुसार तालुक्यातील २ हजार ८९४ कुटुंबाना सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच सदर कुटुंबाना या कार्यालयामार्फत प्रत्येकी १० किलो तांदुळ व १० किलो गहू असे जवळपास ५७ टन धान्य वाटप करणेची कार्यवाही सुरु आहे.
तसेच या अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या पाळीव पशुधनांचे पंचनामे करणेत आलेले असून त्याबाबतही सानुग्रह अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
तालुक्यामध्ये ८१ घरांची पडझड झालेली असून त्याबाबत अनुदान मागणी करणेची कार्यवाही सुरु आहे.
तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे जवळपास २ हजार हेक्टर वरील शेती पिके व जमिनींचे नुकसान झालेले असून सदर नुकसानीबाबत युद्धपातळीवर पंचनामे सुरु आहेत.
तालुक्यातील कोणतीही बाधित व्यक्ती अनुदानापासून वंचित राहणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेणेत येत असून इंदापूर तालुक्यातील सर्व संबंधित शेतकरी बांधव व नागरीक यांनी गाव स्तरावर सुरु असलेल्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी/ग्रामसेवक/कृषी सहाय्यक यांना सहकार्य करावे असे आवाहन बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.