शेटफळगढे (प्रतिनिधी). :रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि कॉलेज शेटफळगढे ता इंदापूर जि पुणे विद्यालयामध्ये माता पालक मेळाव्यानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच यावेळी माता पालकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
यावेळी अक्षर मानव संस्थेच्या बचत घर प्रमुख झरीना खान,कार्याध्यक्ष सुरेखा भोसले,डॉ ज्योती रणदिवे-हिवराळे, प्राचार्य जितेंद्र गावडे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा जयश्री झगडे उपस्थित होते.
यावेळी झरीना खान यांनी स्त्रियांनी मानसिक आरोग्य कसे राखावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष द्यावे,जीवन आनंदात जगावे असेही सांगितले.
अक्षर मानवच्या तालुका कार्याध्यक्ष सुरेखा भोसले यांनीही विद्यालयातील मुलींचे समुपदेशन केले तसेच किशोरवयीन मुलींचा भावनिक विकास यावर मार्गदर्शन केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पाटील व अक्षर मानवच्या आरोग्य प्रमुख ज्योती रणदिवे यांनी महिलांच्या आरोग्य व आहाराविषयी मार्गदर्शन केले. तर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य जितेंद्र गावडे यांनी माता पालक यांना आहार व आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी दोनशेहून अधिक माता पालक उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन अर्चना नाझीरकर यांनी केले तर सविता खराटे व सर्व महिला शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.