इंदापूर ता. 11 : रुई (ता. इंदापूर ) येथे बाबीर देवाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 10 डिसेंबरला संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना या दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला. त्यामुळे हा कार्यक्रम जरी इंदापूर तालुक्यात पार पडला असला तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत सर्वांचाच विषय या निमित्ताने चर्चेला गेला. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याचीच एकमेकांना मारलेल्या शाब्दिक टोल्यांचीच सर्वत्र चर्चा होती.
या कार्यक्रमाला माजी मंत्री व आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे या कार्यक्रमा दरम्यान एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी बोलताना श्री. जानकर म्हणाले, ‘‘सध्या राज्यात सत्तेत असणारे दोन नेते येथे उपस्थित आहेत. पण, सध्या मी सत्तेत आहे का नाही, ? हे मलाच माहीत नाही. हर्षवर्धन पाटील यांचे थेट दिल्लीत चांगले संबंध आहेत. आता ते मोदी, शहांच्या बाजूला जाऊन बसतात. तर, दत्तात्रेय भरणे यांचा फोन गेला की उपमुख्यमंत्री अजितदादा लगेच फाईलवर सही करतात. त्यामुळे हे दोन्हीही नेते मोठे आहेत त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी जास्ती जास्त निधी देण्याची गरज आहे.’’
त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘ भरणेमामा मात्र सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी ते सत्तेत आहेत. मी सत्तेत नाही. त्यामुळे मी वैयक्तिक पंधरा लाखांचा निधी जाहीर करीत असून यातील एक लाख रुपये आज रोख आणलेले आहेत व हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत.’’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्य झाले.
यानंतर भाषणाला आलेले आमदार दत्तात्रेय भरणे म्हणाले , ‘‘आजची मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या भूमिपूजनाची ही सभा राजकीय नसून मंदिराच्या कामासाठी , देणगीदारांची देणगी जमा करण्यासाठी आहे. मात्र काहींना नुसते जाहीर करायची सवय असते. जाहीर करण्यापेक्षा आताच रोख द्या असे म्हणत मंदिराच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन श्री भरणे यांनी यावेळी बोलताना दिले.’’
त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकाला टोले मारण्याची राजकीय नेत्यांनी संधी सोडली नाही त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर एकमेकांना लगावलेल्या राजकीय टोल्याचीच चर्चा सर्वत्र होती.