शेटफळगढे ,ता 12 : यावर्षी पाऊस झाला नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या सर्व नजरा खडकवासला कालव्याच्या आगामी काळातील आवर्तनाकडे लागल्या आहेत. यावर्षी खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात दोन अशी एकूण चार आवर्तने शेतकऱ्यांच्या हितासाठी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करणे गरजेचे आहे.
यावर्षी पाऊस न झाल्याने खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु सुदैवाची बाब म्हणजे इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाला वरदान ठरलेल्या खडकवासला प्रकल्पात सध्या जरी रब्बीतील पिकांसाठीचे पहिले आवर्तन तालुक्यात सुरू असले तरी आज अखेर जवळपास 90% च्या वरती पाणी साठा खडकवासला प्रकल्पात शिल्लक आहे. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील आगामी आवर्तनवर इंदापूर तालुक्यातील 36 गावांमधील शेतकऱ्यांची शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना मे 2024 पर्यंत अवलंबून आहेत.
आगामी मे महिन्यापर्यंत कालव्याच्या क्षेत्रात असलेल्या या विहिरीचे भूमिगत जलस्त्रोत पडल्याने विहिरी देखील आगामी काळात कोरड्या पडणार आहेत. याचा गावचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन आगामी काळात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.
तसेच आगामी सहा महिन्याच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व कुपनलिकालिका देखील कोरड्या पडणार असल्याने आगामी सहा महिन्याच्या काळात सध्या शेतातील त्पिके केवळ विहिरीच्या पाण्यावर जळून जाणार आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये व शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळून जाऊ नयेत. यासाठी सध्या सुरू असलेल्या आवर्तना व्यतिरिक्त इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आणखी तीन आवर्तने खडकवासला प्रकल्पातून सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करावे. व ही आवर्तने सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन इंदापूरच्या हक्काचे पाणी आणावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.. आगामी काळात जर चार आवर्तने आली तरच शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आगामी उन्हाळ्यात टिकतील अन्यथा जलसंपदा विभागाने कमी आवर्तने सोडल्यास पिके उन्हाळ्यात जळतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी संपदा विभागाने आगामी काळात चार आवर्तने ओढणे गरजेचे आहे.