इंदापूर ता.16 : गोरगरीब व तालुक्यातील जनतेचा पाठिंबा असतानाही आजवर केवळ दुसऱ्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे विधानसभा निवडणूक लढवण्यापासून दूर राहिले आहेत. आजवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नात्याने चुलत मामा असलेल्या श्री जगदाळे यांनी आपले भाचे माजी मंत्री पाटील यांना व राज्यात मामा या टोपण नावाने परिचित असलेले माजी मंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना साथ दिलेली आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत श्री जगदाळे हे आपल्या भाच्याला की मामाला साथ देणार की स्वतः नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
श्री जगदाळे यांनी 1995 ते 2004 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपले भाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत साथ दिली होती. परंतु 2009 मध्ये श्री पाटील यांच्यापासून फारकत घेत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दत्तात्रय भरणे यांना साथ दिली त्यानंतर 2014 मध्ये श्री जगदाळे यांनी भरणे मामांना साथ देत त्यांच्या विजयासाठी हातभार लावला होता. तर 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या अटीवर श्री जगदाळे यांनी त्यांचे पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली. परंतु पाटील यांचा पराभव झाला.
श्री जगदाळे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य पद , नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष पद , इंदापूर बाजार समितीचे सभापतीपद भूषवले आहे. सभापती पदाच्या काळात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध उपक्रम व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून इंदापूर बाजार समितीला राज्यात सर्व बाबतीत अव्वल असणाऱ्या पहिल्या पाच बाजार समित्यांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. सध्याही त्यांच्याच विचाराची सत्ता बाजार समितीत तसेच खरेदी विक्री संघावर आहे. तर मागील 20 वर्षापासून ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. या माध्यमातून ते शेतकऱ्यांची कामे करीत आहेत.
श्री जगदाळे हे आजवर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यासाठी थांबले आहेत. 1995 पासून ते जनतेच्या संपर्कात आहेत. गोरगरीब जनतेची ते विविध स्वरूपाची कामे करत आहेत. वाटेल ते झाले तरी चालेल परंतु कोणताही राजकीय किंवा इतर स्वरूपाचा दिलेला शब्द पाळणारा आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देणारा व संकटात धावून जाणारा व गोरगरिबांना मदत करणारा नेता अशी त्यांची इंदापूर सह जिल्ह्यात ओळख आहे. त्यामुळे त्यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यांनी आपला 1995 पासून आजवर तालुक्यातील गोरगरीब जनतेशी आपला असणारा जनसंपर्क कायम ठेवला आहे.
याच गोरगरीब जनतेच्या जोरावर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत श्री जगदाळे हे आपल्या भाच्याला की ‘मामाला’ साथ देणार ? की स्वतःच विधानसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सध्या मात्र श्री जगदाळे हे या दोन्ही मामा व भाच्यापासून अलिप्त आहेत. त्यामुळे या दोघांनीही आपापल्या पद्धतीने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर खरे राजकीय पत्ते ओपन होणार असून कोणीतरी अपक्ष लढणार आहे. त्यामुळे इंदापूरची 2024 ची विधानसभा निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार ? याची उत्सुकता राज्यात लागली आहे. मात्र त्यासाठी आणखी दहा महिने वाट पाहावी लागणार आहे.